मानपाडा पोलीसांनी तत्परतेनं केलेल्या कारवाईमुळं आत्महत्या करणा-या युवकाचा वाचला जीव

मानपाडा पोलीसांनी तत्परतेनं केलेल्या कारवाईमुळं आत्महत्या करणा-या एका युवकाचा जीव वाचू शकला. ठाणे पोलीसांच्या ट्विटर हँडलवर कर्तव्यावर असताना पोलीस हवालदार सानप यांना डोंबिवलीतील एका जागरूक नागरिकानं त्यांचा मित्र आत्महत्या करत असल्याची पोस्ट फेसबुकवर टाकल्याची माहिती दिली आणि त्यास यापासून परावृत्त करण्याची विनंतीही केली. पोलीसांनी फेसबुक पोस्टवरील या युवकाच्या दूरध्वनीवर संपर्क साधला असता फोन कोणीच उचलत नसल्याचं लक्षात आलं. त्यानंतर पोलीसांनी तांत्रिक पध्दतीनं या दूरध्वनीचा ठावठिकाणा शोधला आणि हा दूरध्वनी मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्यानं मानपाडा पोलीसांना त्याची माहिती दिली. मानपाडा पोलीसांनी तत्परतेनं या पत्त्यावर आपली गाडी पाठवली. मानपाडा पोलीस ठाण्याचे दिलीप जाधव, दीपक जाधव, विशाल चौधरी, सुभाष वळवे, शामकांत रायते यांनी तात्काळ युवकाच्या पत्त्यावर जाऊन इमारतीच्या गच्चीवरून आत्महत्या करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या युवकाशी गोड बोलून त्याला खाली उतरवले आणि मानपाडा पोलीस ठाण्यात नेऊन त्याचं समुपदेशन करत त्याला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केलं. हा युवक मानसिक उपचार घेत असल्याचं त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आलं. पण पोलीसांच्या तत्परतेनं या युवकाचा जीव वाचू शकला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading