ठाणे शहरात गेल्या २४ तासात २२० मिलीमीटर तर जिल्ह्यात सरासरी १५८ मिलीमीटर पावसाची नोंद

ठाणे शहरामध्ये गुरूवारपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. यामुळं गेल्यावर्षीच्या पावसाची सरासरी लवकरच ओलांडण्याची शक्यता आहे. ठाण्यामध्ये गेल्या २४ तासात म्हणजे सकाळी साडेआठ वाजेपर्यंत २२० मिलीमीटर पाऊस झाला आहे. या झालेल्या जोरदार पावसामुळं सखल भागात पाणी साचण्याबरोबरच अनेक ठिकाणी झाडं आणि झाडाच्या फांद्या तुटण्याचे प्रकार घडले आहेत. कालच्या पावसात शहरामध्ये जवळपास ४५ ठिकाणी पाणी साचलं होतं तर १३ ठिकाणी झाडं पडण्याच्या घटना घडल्या. जोरदार पाऊस झाल्यामुळं भास्कर कॉलनी, श्रीरंग सोसायटी, वृंदावन अशा अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं. भास्कर कॉलनीतील चिखलवाडी, तबेला, पंपिंग स्टेशन, भांजे वाडी, वंदना चित्रपटगृह परिसर, वीर सावरकर पथ, राम मारूती रस्ता, गोखले रस्ता जलमय झाला होता. चिखलवाडी परिसरातील वृध्द आणि महिला तसंच लहान मुलांची व्यवस्था जिजाऊ गार्डन येथील रोटरी क्लबच्या हॉलमध्ये करण्यात आली. भांजे वाडी येथील महिला, मुलं आणि वृध्दांची व्यवस्था गुरूद्वारामध्ये करण्यात आली होती. या सर्वांना भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष राजेश मढवी आणि त्यांच्या सहका-यांनी नाश्त्याची सुविधा उपलब्ध करून दिली. सकाळी ठाणे-मुंबईमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे रेल्वे सुविधा ठप्प झाल्यानं ठाणे रेल्वे स्थानक ते मुलुंड चेकनाका या मार्गावर परिवहन सेवेच्या विशेष फे-या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. जिल्हाधिका-यांनी शाळा, महाविद्यालयं, शासकीय तसंच निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर केली होती. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही अतिवृष्टीच्या काळात घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं होतं. महापालिका आयुक्त काल रात्रभर लोकप्रतिनिधी, अग्निशमन यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल, अधिकारी आणि प्रभागस्तरीय आपत्कालीन यंत्रणेशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेत होते. मुंबई-ठाण्यातील जोरदार पर्जन्यवृष्टीमुळं मध्य रेल्वेची उपनगरीय सेवा सकाळी ठप्प झाली होती. कल्याण ते छत्रपती शिवाजी टर्मिनस उपनगरीय सेवा बराच काळ बंद होती तर ठाणे ते वाशी ही हार्बर सेवा सुमारे अर्धा तास उशीरानं धावत होती.

ठाणे शहराबरोबरच जिल्ह्यातही गेल्या २४ तासात जोरदार पाऊस झाला आहे. जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासात सरासरी १५८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. सर्वात जास्त म्हणजे २८० मिलीमीटर पाऊस ठाणे तालुक्यात तर सर्वात कमी म्हणजे ६५ मिलीमीटर पाऊस शहापूर तालुक्यात झाला आहे. कल्याण १७५, मुरबाड १०२, उल्हासनगर १९६, अंबरनाथ १६४ तर भिवंडीमध्ये १२५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading