हिंदूंचे असणे हे लोकशाहीच्या टिकण्याचे प्रमुख लक्षण – डॉ. अशोक कुकडे

आत्मस्तुती आणि आत्मक्लेश यापासून हिंदू समाजाने कटाक्षाने दूर राहिले पाहिजे. टोकाचे कौतुक आणि अकारण निंदा हे हिंदूंनी जाणीवपूर्वक टाळले पाहिजे. हिंदू समाजाचे सबलीकरण हे अन्य सर्वांच्या अस्तित्वासाठी गरजेचे आहे. भारत बहुसंख्य हिंदूंचा असल्याने येथे लोकशाहीचे सशक्तीकरण झाले आहे. हिंदूपण हे सर्वसमावेशक आहे. असे उदगार डॉ. अशोक कुकडे यांनी काढले. दीनदयाळ प्रेरणा केंद्र आणि परम मित्र पब्लिकेशन्स आयोजित पुस्तक प्रकाशनच्या कार्यक्रमात डॉ.अशोक कुकडे बोलत होते. रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक रवीकुमार अय्यर यांच्या ‘ग्लिम्पसेस ऑफ हिंदू जिनियस’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांनी केला आहे. हिंदूंचा सर्वव्यापी विचार हे पुस्तक परम मित्र पब्लिकेशन्सने प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन पदमविभूषण डॉ. अशोक कुकडे यांच्या हस्ते झाले. डॉ. अशोक कुकडे पुढे म्हणाले, हिंदुपणाची पहाट होत आहे. पण मोठा पल्ला गाठायचा आहे. भारतातील राजकीय क्षेत्रातील बदल, सत्तेतील बदल ही सुरुवात आहे. रा.स्व.संघाच्या विचारधारेच्या काही पिढ्यांच्या परिश्रमाने, बलिदानाने बदल होत आहे. हा बदल आश्वासक आहे. या बदलाचे आपण साक्षीदार आहोत. पण, वाहकही झाले पाहिजे. डॉ. कुकडे पुढे म्हणाले, रा.स्व.संघ स्वामी विवेकानंद यांचे कार्य पुढे नेत आहे. काळानुसार बदल झाले पाहिजे केवळ विचार उदात्त असून उपयोग नाही. विचार समाजात रुजवता आला पाहिजे. लोकशाही आणि सहअस्तित्व हे बहुसंख्य हिंदूच्यामुळेच टिकून राहिले आहे. हिंदूंचे असणे हे लोकशाहीच्या टिकण्याचे प्रमुख लक्षण आहे, असे ठाम प्रतिपादन डॉ. अशोक कुकडे यांनी केले. दीनदयाळ प्रेरणा केंद्राचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुधाकर ओजाळे आणि चंद्रकांत धोपाटे यांचा डॉ. अशोक कुकडे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading