बुलेट ट्रेनसाठीच्या जमिनीवरील आरक्षण बदलास राष्ट्रवादी करणार विरोध

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बुलेट ट्रेनला विरोध करणार आहेत. एका पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी ही भूमिका मांडली. बुलेट ट्रेनसाठी महापालिका क्षेत्रातील ३६.६२ हेक्टर भूसंपादन करावं लागणार आहे. मात्र ही जागा विकास आराखड्यात शाळा, पोलीस ठाणे, प्रभाग समिती कार्यालय, मलनिस्सारण प्रकल्प अशांसाठी आरक्षित आहे. त्यामुळं त्यांचं आरक्षण बदलावं लागणार आहे. गेल्यावर्षी महापालिकेनं आरक्षण फेरबदलाचा प्रस्ताव तयार केला होता आणि तो सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीला आणण्यासाठी महापौरांकडे पाठवला होता. मात्र त्यावेळी शिवसेनेनं हा प्रस्ताव विषय पत्रिकेवर घेतला नव्हता. आता उद्याच्या सर्वसाधारण सभेपुढे हा प्रस्ताव मंजुरीसाठी आणला जाणार आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध असल्याचं आनंद परांजपे यांनी सांगितलं. गेल्या १० ते १५ दिवसापासून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत आहे. विस्तारीत ठाणे रेल्वे स्थानकाची एकही वीट पुढे सरकत नाही. ठाणे ते दिवा पाचवा आणि सहावा रेल्वे मार्ग, कल्याण टर्मिनसच्या समस्या या बाबींकडे निवडून आलेल्या खासदारांचं दुर्लक्ष होत आहे. मात्र बुलेट ट्रेनला पायघड्या घालून भूमिपुत्रांच्या जमिनीवर नांगर फिरवला जात आहे. भूमिपुत्रांच्या शेत जमिनी संपादित करून त्यांना देशोधडीला लावण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा तीव्र विरोध असून राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक सर्वसाधारण सभेत या प्रस्तावाला विरोध करणार असल्याचं आनंद परांजपे यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading