घोडबंदर रोड बनलाय वाहने उलटणारा रस्ता

पूर्व द्रूतगती महामार्गाला जोडणारा घोडबंदर रोड सध्या वाहने उलटणारा रस्ता बनला आहे. गेल्या आठ दिवसात या रस्त्यावर तीन अवजड वाहनं उलटल्याच्या घटना घडल्या आहेत. काल पहाटे कापुरबावडी जंक्शन नजिक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं लाकडी फळ्या आणि कागदाची बंडलं वाहून नेणारा ट्रक उलटला. सुदैवानं यामध्ये कोणी जखमी झालं नसलं तरी हा ट्रक रस्त्यावरून बाजूला करण्यासाठी तीन तास लागले. अहमदाबाद ते केरळ लाकडी फळ्या आणि कागद वाहून नेणा-या ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं काल पहाटे साडेपाचच्या सुमारास कापुरबावडी जंक्शन जवळील दुभाजकाला जाऊन धडकला. या अपघातामधील लाकडी फळ्या आणि कागदाची बंडलं रस्त्यावर पसरल्यानं या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. अपघातग्रस्त ट्रक आणि ट्रकमधील माल हलवण्याचं काम करण्यास सकाळचे ९ वाजल्यानं काही काळ वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. पहाटेच्या वेळेत वारंवार घडणा-या या अपघातांना ब-याच अंशी चालक जबाबदार असल्याची माहिती वाहतूक पोलीसांनी दिली. पहाटे डुलकी लागल्यास अथवा भरधाव वेगात जाताना वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं अशा घटना घडत आहेत. २९ मे रोजी कापुरबावडी उड्डाणपूलावर कंटेनर उलटला होता. तर २ जून रोजी ज्युपिटर रूग्णालयाजवळ दगड वाहून नेणारा ट्रक उलटल्यानं वाहतूक कोंडी झाली होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading