मलनिस्सारण वाहिनीसाठी खणलेल्या खड्ड्यात अर्टिगा गाडी पडल्यानं वाहन चालकाचा मृत्यू

मलनिस्सारण वाहिनी टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात कार उलटून झालेल्या दुर्दैवी अपघातात एक प्रवासी ठार झाला आहे. एकीकडे महापालिका आयुक्त जिवितहानी कुठे होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश देत असतानाच दुसरीकडे हा अपघात झाल्यामुळं संताप व्यक्त होत आहे. आज सकाळी साधारणत: ६ च्या सुमारास घोडबंदर रस्त्यावर ही दुर्दैवी घटना घडली. सचिन काकोडकर हे मारूती सुझुकी अर्टीगा या गाडीनं निलकंठ ग्रीन्सकडून घोडबंदर रस्त्याकडे जात होते. मुल्लाबाग बस डेपोजवळ ईगल कंस्ट्रक्शन कंपनीनं मलनिस्सारण वाहिनी टाकण्यासाठी खड्डा खोदला आहे. मुल्लाबाग बस डेपोजवळ काकोडकर यांची गाडी येताच मलनिस्सारण वाहिनी टाकण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात त्यांची कार उलटी झाली. यामुळं गाडीचा चेंदामेंदा झाला. काकोडकरही यामध्ये गंभीर जखमी झाले. गाडीचा चेंदामेंदा झाल्याने ते गाडीमध्येच अडकून पडले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही गाडी खड्ड्यातून बाहेर काढली. त्यानंतर काकोडकर यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या कामाच्या ठेकेदारानं निविदेमधील अटी-शर्ती तसंच सुरक्षेसाठी करावयाच्या उपयायोजनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले म्हणून ठेकेदार आणि या कामकाजावर देखरेख ठेवणारे पालिकेचे अधिकारी अपघातास जबाबदार ठरवून ठेकेदारासह संबंधित अधिका-यांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading