प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मालवाहू वाहनांना दिली जाणारी फिटनेस सर्टिफिकेट बनावटपणे तयार करणा-या एका व्यक्तीस अटक

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मालवाहू वाहनांना दिली जाणारी फिटनेस सर्टिफिकेट बनावटपणे तयार करणा-या एका व्यक्तीस गुन्हे शाखेनं जेरबंद केलं आहे. व्यावसायिक वाहनांना दरवर्षी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून पासिंग करावं लागतं. ठाण्यातील वाहतूक व्यावसायिक त्यांच्या वाहनांचं पासिंग हे आरटीओ एजंट मार्फत करून घेतात. अशाचप्रकारे प्रादेशिक परिवहन कार्यालयाची बनावट कागदपत्रं देऊन फसवणूक केली जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. अशाच प्रकारे दोन टेम्पोंचे बनावट फिटनेस सर्टिफिकेट दिल्याची माहिती पोलीसांना लागली होती. याची पडताळणी करण्यात आली असता ही फिटनेस सर्टिफिकेट बनावट असल्याचं निष्पन्न झालं होतं. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितीन ठाकरे यांनी तन्वीर खान यांच्या तक्रारीवरून तपास सुरू केला. याप्रकरणी आरोपीचा शोध घेतला जात असताना अशी बनावट फिटनेस सर्टिफिकेट बनवणारी व्यक्ती ठाणे रेल्वे स्थानकातील रिक्षा स्टँडजवळ येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्या चौकशीत त्यानं अशी बनावट सर्टिफिकेट तयार करत असल्याची कबुली दिली. त्यामुळं त्याला अटक करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading