११ वर्षीय मुलाच्या हातात सोसायटीच्या प्रवेशद्वाराची लोखंडी सळई घुसल्यामुळं खळबळ

क्रिकेट खेळत असताना चेंडू आणण्याच्या नादात ठाण्यातील एका ११ वर्षीय मुलाच्या हातात सोसायटीच्या प्रवेशद्वाराची लोखंडी सळई घुसल्यामुळं काही काळ खळबळ उडाली होती. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकानं त्वरीत धाव घेऊन हर्ष शिंदे याची सुटका केली. शाळकरी मुलं सध्या उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळं सोसायटीच्या आवारात क्रिकेट खेळत होती. ठाण्यातील लुईसवाडी भागात राहणारा हर्ष शिंदे हा आपल्या मित्रांसमवेत क्रिकेट खेळत असताना चेंडू धरोडीया अपार्टमेंटच्या बाहेर गेला. तेव्हा चेंडू आणण्यासाठी सोसायटीच्या गेटवरून उडी मारत असताना गेटवरील धारधार लोखंडी सळई हर्षच्या हातात आरपार घुसली. यावेळी सोबतच्या मित्रांनी रहिवाशांकडे मदतीसाठी धावा केला. रहिवाशांनी अग्निशमन दलाला पाचारण केलं. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकानं हर्षची यातून मुक्तता केली. नंतर त्याला सिव्हील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. आता हर्ष सुखरूप असला तरी हर्षच्या पालकांनी त्याच्या हाताला झालेली दुखापत गंभीर असल्याचं सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading