दीड वर्षाच्या लहानगीचे अपहरण करणाऱ्या महिलेसह तिच्या अल्पवयीन साथीदाराला कोपरी पोलिसांनी अवघ्या बारा तासात केले जेरबंद

आईच्या कुशीत झोपी गेलेल्या दीड वर्षाच्या लहानगीचे अपहरण करणाऱ्या महिलेसह तिच्या अल्पवयीन साथीदाराला कोपरी पोलिसांनी अवघ्या बारा तासात जेरबंद केले आहे.अपहरणकर्त्याची एक साथीदार महिला अद्याप फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.ही घटना काल पहाटे ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील पूर्वेकडील पार्किंग परिसरात घडली होती.अपहृत मुलीला तिच्या आईकडे सुखरूप सुपूर्द करण्यात आले. अशी माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ठाणे स्थानकाच्या फलाट क्रमांक १० बाहेरील पार्किंग क्षेत्रात आपल्या दोन लहानग्या मुलांसह झोपी गेलेल्या राधा मुळेकर या कचरावेचक महिलेच्या दीड वर्षीय पूजा या लहानगीचे पहाटेच्या सुमारास अपहरण झाल्याची माहिती कोपरी पोलिसांकडे आली.त्यानुसार,पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत रेल्वे स्टेशनचे सीसी टीव्ही फुटेज आणि इतर कचरावेचकांकडे चौकशी सुरु केली.त्यानुसार,१५ वर्षीय अल्पवयीन मुलाने झोपी गेलेल्या लहानग्या पूजाला उचलून नेल्याचे कळताच तपासाची चक्रे फिरवून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगरकर आणि पोलीस निरीक्षक दत्ता गावडे आदींच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक सकपाळे आणि शिंदे आदींनी विकीनामक बालकाला ताब्यात घेतले.त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर अपहरणकर्ती शाहिस्ता शेखचा छडा लागला.तसेच,तिच्या नातेवाईकाकडे लपवून ठेवलेल्या मुलीची सुखरूप सुटका करून बाळाला मातेच्या स्वाधीन केले.घरकाम करणारी आरोपी महिला शाहिस्ता ही विवाहित असून ती मूळची गोवंडी येथील राहणारी आहे.मात्र,तिने मुलीचे अपहरण का केले याची चौकशी सुरु आहे.अशी माहिती उपायुक्त अंबुरे यांनी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading