पद्मभूषण ताराबाई मोडक पुरस्कार नाशिकच्या आनंद निकेतन या संस्थेस तर पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार कारंज्याच्या सुचिता सोळंके यांना जाहीर

पद्मभूषण ताराबाई मोडक पुरस्कार नाशिकच्या आनंद निकेतन या संस्थेस तर पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार कारंज्याच्या सुचिता सोळंके यांना जाहीर झाला आहे. एका पत्रकार परिषदेत नूतन बाल शिक्षण संघाचे अध्यक्ष चंद्रगुप्त पावसकर यांनी ही माहिती दिली. येत्या १९ एप्रिल रोजी या पुरस्काराचं वितरण मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि जोशी- बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांच्या हस्ते होणार आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या नूतन बाल शिक्षण संघ या संस्थेच्या माध्यमातून ताराताई मोडक आणि अनुताई वाघ यांनी पूर्व प्राथमिक शिक्षणाचा पाया रचला. त्यांच्या या कार्याची प्रेरणा मिळावी म्हणून अशाच प्रकारे कार्य करणा-या व्यक्ती आणि संस्थांना प्रोत्साहन मिळावं म्हणून गेली ३ वर्ष संस्था आणि व्यक्तींना पुरस्कार दिले जात आहेत. ताराताई मोडक यांच्या १२५व्या जयंती दिनाचं औचित्य साधून २०१७ पासून ताराताईंच्या स्मरणार्थ एक संस्था आणि अनुताईंच्या स्मरणार्थ एक व्यक्ती यांना प्रत्येकी २५ हजारांचं पारितोषिक देऊन गौरवलं जातं. यंदा नाशिकच्या आनंद निकेतन या संस्थेची ताराताई मोडक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. पारंपरिक गुणस्पर्धेला फाटा देऊन परसबाग आणि दैनंदिन व्यवहाराचे शिक्षण या संस्थेतून दिलं जातं. श्रम आधारीत अनुभवातून शिक्षण देण्यावर या संस्थेत भर दिला जातो. तर अनुताई वाघ पुरस्कारासाठी फासेपारधी समाजातील सुचिता सोळंके यांची निवड झाली आहे. सुचिता सोळंके या फासेपारधी समाजातील असून त्यांनी फासेपारधी मुलांसाठी झाडाखाली अंगणवाडी सुरू करून या मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. २ ते ६ वर्षापासून शिक्षण दिल्यास मुलांना शिक्षणाची गोडी लागते. आज त्यांच्या अंगणवाडीतील मुलं आता नववीत गेली आहेत. पत्रकार विजय कुवळेकर आणि प्राचार्य अनंत गोसावी यांच्या द्विसदस्यीय समितीनं पुरस्कारांसाठी ही निवड केली आहे. येत्या शुक्रवारी सहयोग मंदिर येथे हे पुरस्कार प्रदान केले जातील अशी माहिती नूतन बाल शिक्षण संघाचे अध्यक्ष चंद्रगुप्त पावसकर यांनी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading