नवीन शैक्षणीक धोरणाची अंमलबजावणी येत्या शैक्षणीक वर्षापासुन-नितिन करमळकर

पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि या धोरण अंमलबजाणी समितीचे प्रमुख नितिन करमळकर यांनी उच्च शिक्षणाचे भारतीयीकरण करण्याची गरज व्यक्त केली. नवीन शैक्षणीक धोरणाची अंमलबजावणी येत्या शैक्षणीक वर्षापासुन केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर कला- वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयात ‘नवे शैक्षणिक धोरण २०२०: अंमलबजावणी आणि पुढील वाटचाल’ या विषयावरील एक दिवसीय चर्चासत्रात त्यांनी ही गरज व्यक्त केली. या चर्चासत्राचे आयोजन रामानंद आर्य डी.ए.व्ही. स्वायत्त महाविद्यालय,आणि जोशी बेडेकर स्वायत्त महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. शिक्षणातून विविध कौशल्ये,नीतिमूल्ये आणि सोबतच मातृभाषेत शिक्षण या सर्व बाबींचा समावेश या धोरणात असल्याचे यावेळी अधोरेखित केले. साचेबद्ध निकष बाजुला ठेवत प्रत्यक्ष कृती करून शिकण्यावर भर देणाऱ्या नवनविन आंतरशाखीय अभ्यासक्रमांचा आराखडा तयार करण्याचे त्यांनी आवाहन केले. विद्यार्थ्यांना केवळ पदवी नव्हे तर विविध कौशल्ये विकसित करून आर्थिक सक्षमता प्राप्त करून देण्यासाठी हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असल्याचे मत मुंबई विदयापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के, यांनी व्यक्त केले. या धोरणाच्या अंमलबजावणीत शिक्षकांची,स्वायत्त महाविद्यालयांची भूमिका महत्वाची ठरणार असून लवकरात लवकर हे धोरण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायला हवे असे डॉ. शिर्के यांनी सांगीतले. यावेळी उपकुलगुरू डॉ.अजय भामरे यांनीही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कोणताही बाऊ न करता स्वीकारणे गरजेचे असल्याचे सांगत याची अंमलबजाणी उत्तम होणार याची खात्री दिली. या उद्घाटनाच्या सत्रात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांनी कृतीयुक्त शिक्षण देण्याचे आव्हान स्वीकारायला प्राध्यापकांनी तयार राहण्याची गरज असल्याचे सांगितले. विद्या प्रसारक मंडळाचे डॉ.महेश बेडेकर यांनीही हे शैक्षणिक धोरण राबवताना अडचणी येणार पण आपण त्या पार करून चांगली अंमलबजावणी करू हा विश्वास यावेळी दिला. या प्रसंगी एस. एन. बोस मुलभुत विज्ञान केंद्राचे अध्यक्ष डॉ.बी. एन. जगताप, मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ.रविंद्र कुलकर्णी, आनंद मापुस्कर, प्रा.संतोष परुळेकर हे तज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. विद्या प्रसारक मंडळाचे डॉ.विजय बेडेकर तसेच अनेक शिक्षणतज्ञ, प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक या कार्यक्रमास उपस्थित होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading