महापालिकेच्या सर्व माता आणि बाल रुग्णालयात सर्व शस्त्रक्रिया विभाग कार्यान्वित करणे गरजेचे महापालिका आयुक्त यांचे आदेश

ठाणे महानगरपालिकेच्या सर्व माता बाल रुग्णालयात सर्व शस्त्रक्रिया विभाग
कार्यान्वित करणे गरजेचे आहे या सोबतच सर्व ठिकाणी फक्त इलेक्टिव्ह सिझेरियन नव्हे तर तर इमर्जन्सी सिझेरियनची सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देत असतानाच माता बाल केंद्रामधील स्त्रीरोगतज्ज्ञांची पूर्ण वेळ उपस्थिती अनिवार्य असलीच पाहिजे, यासाठी अतिरिक्त स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञांची आवश्यकता असेल तर ते उपलब्ध करुन देण्याच्या सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. वागळे इस्टेट येथील शिवाजीनगर आरोग्यकेंद्र आणि मीनाताई ठाकरे प्रसुतीगृहाची पाहणी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली. आरोग्य केंद्रात स्त्रीरोगतज्ज्ञ आणि इतर डॉक्टरांची अनुपस्थिती, आरोग्यकेंद्राची दुरावस्था, आवश्यक वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता आदी बाबी दिसून येताच याबाबत संबंधितांना जाब विचारत ठाणे महापालिकेच्या सर्व विभागातील आरोग्यकेंद्रात सेवेत असलेल्या निवासी डॉक्टरांना पूर्णवेळ कार्यरत राहण्याचे निर्देश दिलेत. महापालिका कार्यक्षेत्रात विभागनिहाय आरोग्यकेंद्र कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. यापैकी शिवाजीनगर आरोग्य केंद्राची पाहणी आयुक्तांनी आज दुपारी एक वाजता केली. यावेळी दैनंदिन सेवेत असलेले स्त्रीरोगतज्ज्ञ दुपारी बारा वाजता दुसऱ्या आरोग्य केंद्रात गेल्याची बाब निदर्शनास आली. यावेळी संपूर्ण आरोग्य केंद्रातील सोनोग्राफी कक्ष, शस्त्रक्रिया विभागाची पाहणी करीत असताना लॉबीमध्ये वापरात नसलेले बेडस् आणि इतर साहित्य तातडीने हटवून लॉबी तात्काळ मोकळी करण्यात यावी. आरोग्‌यकेंद्रातील ओपीडी ही पहिल्या मजल्यावर असून ती तळमजल्यावर करणेबाबत कार्यवाही करावी जेणेकरुन गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी सोयीस्कर होईल असेही त्यांनी नमूद केले. प्रसुतीगृहात नावनोंदणीसाठी येणाऱ्या गरोगर मातांची नोंदणी दररोज सुरू राहील या दृष्टीने नियोजन करावे. संपूर्ण आरोग्य केंद्रातील आवश्यक स्थापत्य कामे करुन उपलब्ध कक्ष नीटनेटके आणि स्वच्छ राहतील यासाठी देखील योग्य ती दक्षता घ्यावी. तसेच रुग्णालयातील गळती काढणे, प्लास्टर, विद्युतीकरण आदी कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही संबंधितांना यावेळी बांगर यांनी दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading