कोरोनाविषयक राज्यातही उपाययोजना करण्याची आमदार प्रताप सरनाईकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव पुन्हा वाढत असल्याच्या बातम्या येत असून राज्यातही याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. चीनमध्ये बहुतांश शहरातच नाही तर ग्रामीण भागामध्ये सुध्दा कोरोना वाढत असल्याचे निर्दशनास येत असून रूग्णांना बेड कमी पडत असल्याचे सांगण्यात येत आहे. तज्ज्ञाच्या मते पुढील तीन महिन्यात चीनमध्ये अंदाजे ८० कोटी बाधीत होणार असून मोठ्या प्रमाणावर मृत्यु होण्याचे अंदाज वर्तविण्यात येत आहेत. तसेच चीनसह अमेरिका, कोरिया, ब्राझील, जपान मध्ये सुध्दा कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे.
भारतामध्ये सुध्दा दिवसाला २० कोरोना रूग्ण आढळून येत आहेत. कोरोनाच्या कोणत्या विषाणूचा प्रार्दुभाव आहे हे जाणून घेऊन त्यावर योग्य उपाय योजना करण्यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयातर्फे जिनोम सिक्वेन्सिंगची चाचणी करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये यासाठी राज्य सरकारने सुध्दा योग्य ती पावले उचलणे गरजेचे आहे. त्यासाठी विमानतळ, रेल्वे स्थानक, मेट्रो स्थानक, बस स्थानक तसेच अतिसंवेदनशील ठिकाणी आर.टी.पी.सी.आर. चाचणी, रॅपिड अँटीजेन चाचणी करण्याचे प्रमाण वाढवावे. तसेच नागरिकांना मास्क आणि स्यानीटायझर वापरण्याची सक्ती करावी. राज्य सरकारतर्फे कोविड सेंटर पुन्हा चालू करून त्यामध्ये ऑक्सिजनची सुविधा, आय.सी.यू. बेडची व्यवस्था करावी तसेच अत्यवस्थ रूग्णांसाठी व्हेन्टिलेटर्सची सुविधा असलेल्या बेडची व्यवस्था करावी. तसेच कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाल्यानंतर सर्व प्रथामिक आरोग्य केंद्रे, पालिका रूग्णालयांमध्ये ज्या सुविधा बंद करण्यात आल्या होत्या त्या पुन्हा सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासनाला सुचना करण्यात याव्यात. तसंच
या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन योग्य त्या उपाय योजना करण्यासाठी संबंधितांना निर्देश द्यावेत अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading