शाळेमध्येच शिक्षकांकडून दलित विद्यार्थ्यांचा जातीय छळ – राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक

वाल्मिकी समाजाच्या विद्यार्थ्यांचा जातीय छळ केला जात असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने  रामनगर येथील साधना शाळेमध्ये आंदोलन करण्यात आले.
रोड नं 28,रामनगर,वागळे इस्टेट येथे साधना विद्यालय आहे. या शाळेत रामनगर भागातील वाल्मिकी समाजाचे अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्याना इतर विद्यार्थ्यांच्यासोबत न बसवता जमिनीवर बसविणे, त्यांना वारंवार शिक्षा करणे, जातीवाचक शब्दात अपमान करणे आदी प्रकार केले जात असल्याच्या तक्रारी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल्ल कांबळे यांच्याकडे काही पालकांनी केल्या होत्या. या तक्रारींची खातरजमा केली असता, या शाळेतील एक शिक्षिका जाणीवपूर्वक दलित विद्यार्थ्यांना त्रास देत असून पालकांना भेटायला बोलावून “तुमच्या जातीची मुले शिक्षण घेतातच कशाला? त्यांना इतर मुलांप्रमाणे उनाडक्या करु देत; त्यांची शिक्षण घेण्याची लायकी नाही”, अशा पद्धतीची विधाने केेल्याचे पालकांनी सांगितले. त्यानंतर प्रफुल्ल कांबळे यांनी शाळा प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, शाळा प्रशासनाने त्यांना भेटही नाकारली. त्यामुळे या शिक्षिकेवर कारवाई करावी; तिच्यावर अट्रोसिटी अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशावरून आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली व महिलाध्यक्ष सुजाता घाग यांच्या उपस्थितीत शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी शाळा प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत संबधित शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
यावेळी प्रफुल्ल कांबळे यांनी सांगितले की, शाळा हे ज्ञानदान करण्याचे माध्यम आहे. मात्र, या शाळेत ज्ञानदान करण्याऐवजी चक्क विषमता पसरविण्याचे काम केले जात आहे. हे काम अत्यंत चुकीचे असून अशा पद्धतीने संविधानातीळ समतेच्या तत्वाला हरताळ फासणार्‍या शिक्षिकेला शिक्षणाच्या क्षेत्रात राहण्याचा अधिकार नाही. या शिक्षिकेला तत्काळ बडतर्फ करुन तिला अटक करावी; अन्यथा, आम्ही हे आंदोलन अधिकाधिक तीव्र करु, असा इशारा दिला. यावेळेस शाळेच्या  मुख्याध्यापिका अश्विनी फुलसुंदर यांनी आंदोलकांची भेट घेऊन माफी मागितली. तसेच संबधित शिक्षकांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले

Leave a Comment

%d bloggers like this: