सिद्धहस्त लेखक, व्यासंगी आणि ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आदिनाथ हरवंदे यांचे निधन

सिद्धहस्त लेखक, व्यासंगी आणि ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आदिनाथ हरवंदे यांचे नुकतेच निधन झाले. ते ७८वर्षांचे होते. गेले वर्षभर ते कर्करोगाशी झुंज देत होते. ठाण्यातील जवाहरबाग स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आदिनाथ हरवंदे हे रत्‍नागिरीच्‍या जांभारी गावचे. त्यांनी औद्योगिक विकास आणि गुंतवणूक महामंडळात अर्थातच सिकॉमच्या जनसंपर्क विभागात एकतीस वर्षे नोकरी केली. ते २००२ साली सिकॉमच्या जनसंपर्क विभागाचे प्रमुख, वरिष्ठ व्यवस्थापक पदावरून निवृत्‍त झाले. सिकॉमच्या पूर्वी त्यांनी मंत्रालयातील वित्त विभागात नोकरी केली होती. १९७५ पासून लोकप्रभा, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सामना, लोकमत, नवशक्ती, वृत्तमानस इत्यादी वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमध्ये क्रीडा, उद्योग, नाटक, चित्रपट आणि पर्यटन इत्यादी विषयांवर सातत्याने लेखन केले. क्रिकेट परीक्षणासाठी त्‍यांनी देशांतर्गत आणि देशाबाहेर अनेक दौरे केले. त्‍यांनी धावपटू, विश्‍वचषक क्रिकेटचा जल्‍लोष, कसोटी क्रिकेट ते एकदिवसीय क्रिकेट, खेलरत्‍न महेंद्रसिंग धोनी, चौसष्‍ट घरांचा बादशहा – विश्‍वनाथ आनंद अशी क्रीडासंदर्भात पुस्‍तके लिहिली. त्यांच्या कसोटी क्रिकेट ते एकदिवसीय क्रिकेट ह्या पुस्‍तकाला राज्य शासनाचा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार प्राप्त झाला आहे. लालबाग, ‘जिगीषा’ ह्या कादंब-यांना को.म.सा.प. चा र. वा. दिधे पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांचा २००६ साली सचिन तेंडुलकरच्‍या हस्‍ते ‘ज्‍येष्‍ठ क्रीडा पत्रकार’ म्हणून सत्कार झाला होता. त्यांच्या जाण्याने क्रीडा आणि पत्रकारिता या क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी गीता, मुलगा अनिल, मुलगी डॉ. प्रज्ञा, जावई, सुन आणि नातवंडे असा परिवार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading