शहरात सुरू असलेली प्रकल्प कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या आयुक्तांच्या सूचना

महापालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या कामांची पाहणी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली. या पाहणी नंतर आज महापालिकेत आढावा बैठक घेवून सुरू असलेली प्रकल्प कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच कंत्राटदाराकडून सर्व कामे उत्कृष्ट दर्जाची करुन घेण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची राहिल आणि यामध्ये कोणतीही कसूर तसंच काम निकृष्ट दर्जाचे आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही बांगर यांनी दिला. वागळे इस्टेट विभागात सुरू असलेल्या कामांची माहिती आढावा बैठकीत घेण्यात आला .यावेळी रोड नं. १६ हे महत्वाचे जंक्शन असून या ठिकाणी अनेक ठिकाणचे रस्ते जोडले जातात. या रस्त्यावर ठिकठिकाणी यू टर्न आहेत, याबाबत वाहतूक विभागाशी चर्चा करून सद्यस्थितीत बॅरिगेटस् उभारुन वाहतूक कोंडी होते किंवा कसे याबाबत आढावा घेवून अनावश्यक यू टर्न बंद करावे. रायलादेवी तलाव येथे सुरू असलेल्या कामाकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद केल्याबद्दल अधिकाऱ्यांना जाब विचारत कोणतेही काम निकृष्ट स्वरुपात केल्याचे आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल. साऊथ कोस्ट हॉटेलसमोरील एफओबीलगत असलेला रस्ता दुरावस्थेत असल्यामुळे नागरिक त्याचा वापर करीत नाही तरी सदर फूटपाथचे काम तातडीने करण्यात यावे. चौकामध्ये दोन रस्ते ज्या ठिकाणी जोडले जातात त्या रस्त्यांची पातळी एकसमान असली पाहिजे, रस्ते उंचसखल असल्यामुळे तेथे वाहनांची गती कमी होवून वाहतूक कोंडी होते. वाहतूक सुरळीत होण्याकरिता एकमेकांना जोडणाऱ्या रस्त्याची पातळी समान राहिल याकडे लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. अभियंत्याना त्यांचे क्षेत्र निश्चित करुन दिलेले असल्यामुळे त्यांनी प्रत्यक्ष जागेवर उपस्थित राहणे गरजेचे आहे. महत्वाच्या साईटच्या ठिकाणी दररोज भेटी देणे आवश्यक आहे. त्यांनी कार्यालयात बसून काम करणे अपेक्षित नसल्याचेही बांगर यांनी नमूद केले. रोड नं. १६ या मुख्य रस्त्यावर विविध ठिकाणी असलेल्या गतिरोधकाची दुरावस्था असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे, याबाबत वाहतूक विभागाशी समन्वय साधून गरज नसल्यास गतिरोधक काढावेत किंवा दुरूस्त करावेत. शहरामध्ये अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला जुन्या भंगार गाड्या पडून राहिलेल्या दिसतात, या गाड्यामुळे तेथे अस्वच्छता होते, जागा व्यापली जाते, रस्ता अरुंद होते. याबाबत महानगरपालिका व वाहतूक पोलीस विभाग या दोघांनीही स्वतंत्रपणे वेळोवेळी कारवाई करुन या गाड्या हटविल्या जातील याबाबत दक्षता घेवून नागरिकांना रस्ते मोकळे करुन देणे गरजेचे आहे. सध्या रस्त्यावर शहरातील झेब्रा काँसिंग, साईडपट्टया, मिडीयन दाखवणाऱ्या पट्टया अस्तित्वात नाही, याबाबत संपूर्ण शहरात ड्राईव्ह घेण्यात यावा. थर्मोप्लास्ट पेंटद्वारे त्या पेंट कराव्यात. ज्या ठिकाणी पार्किंग अनुज्ञेय आहे किंवा नो पार्किंग झोन आहे, त्या ठिकाणी तशा पध्दतीच्या रंगाच्या पट्टया थर्मोप्लास्टद्वारे पेंट करण्यात याव्यात. शहरातील चौक हे फेरीवाल्यांनी व्यापल्यामुळे या ठिकाणी वाहनांची गती कमी होत असल्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होते. हे सगळे चौक फेरीवाला मुक्त करुन सुशोभित करण्यात यावे, जेणेकरून वाहतुक सुटण्याबरोबरच शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडणार आहे. सर्व प्रभागसमितीमध्ये सौंदर्यीकरणाची कामे होतील याबाबत कार्यवाही करावी, सर्व कार्यकारी अभियंत्यांनी त्यांच्या स्तरावर पथके तयार करावीत. तसेच संपूर्ण शहरात कामे होतील या दृष्टीने जलदगतीने कामे करावीत. महापालिकेने नुकतेच सौंदर्यीकरणबाबत अभियान सुरू केलेले आहे. यासाठी आपण विशिष्ट कालावधी निश्चित केलेला आहे. संपूर्ण महापालिका क्षेत्रात स्वच्छतेबरोबर सौंदर्यीकरणावर भर देवून त्यामध्ये दर्जा राखला जाईल यावर कटाक्षाने लक्ष देण्याच्या सूचनाही यावेळी बांगर यांनी दिल्या. ठाणे शहरात सुरू असलेली कामे ही दर्जात्मक होतील याकडे संबंधित कार्यकारी अभियंत्यांनी लक्ष द्यावे, कामे दर्जाहीन झाली तर त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल. सर्व कामे वेळेत पूर्ण होतील या दृष्टीने जलदगतीने कामे करण्यात यावी. प्रत्येक कामाच्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्याने प्रत्यक्ष उपस्थित राहून कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. दिलेल्या सूचनांनुसार सर्व कामे झाल्यानंतर पुन्हा पाहणी करण्यात येणार असल्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading