पंडित राम मराठे संगीत महोत्सवातून डावलल्याबद्दल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखेनं केला निषेध

यंदाच्या पंडित राम मराठे संगीत महोत्सवातून डावलल्याबद्दल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखेनं निषेध केला आहे. ठाणे शाखेच्या वतीनं असं पत्र महापालिका आयुक्तांना देण्यात आलं. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखेच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून ठाण्यामध्ये संगीतभूषण पंडित राम मराठे संगीत समारोहाला सुरुवात झाली होती या महोत्सवाला ठाणे महापालिकेने विशेष ठरावाद्वारे सहकार्य दिलं आणि करोनामुळे खंड पडण्याआधी गेली 26 वर्ष प्रत्यक्ष आणि करोनाकाळातही ऑनलाइन पद्धतीने हा महोत्सव घेऊन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखेने या उत्सवाचं नाव देशातल्या प्रतिष्ठित संगीत उत्सवात नेले आहे. मात्र यंदाही सातत्याने प्रयत्न करूनही पूर्वनियोजित तारखांना चार ते सात नोव्हेंबर या कालावधीत हा उत्सव आयोजित होऊ शकला नाही पालिका अधिकारी वर्गाने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. यासंबंधित आयोजित बैठकाही ऐनवेळी रद्द केल्या गेल्या. मात्र आता या उत्सवाचे नाट्य परिषदेला डावलून महापालिकेने आयोजन केल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्या महापालिका प्रशासक असल्यामुळे लोकप्रतिनिधींचा अंकुश वा सहभाग पालिकेत नाही. त्यातच आयुक्त स्वतः आणि जनसंपर्क विभागाची जबाबदारी असलेले नव्यानेच महापालिकेत आलेले अधिकरी यांचा गैरफायदा घेऊन आपल्या कोणी अधिकाऱ्यांनी सर्व संकेत, प्रथा, संबंधित ठराव यांची पायमल्ली करत हा एकांगी निर्णय घेतला हे उघड आहे.
याबद्दल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखेच्या वतीने आयुक्तांना पत्र देऊन याचा निषेध करण्यात आला. या प्रकरणात कुठे आणि कशी अनियमितता झाली याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि सांस्कृतिक राजधानी असलेल्या ठाण्यातले कला उपक्रम यापुढेही विविध कलासंस्था आणि महापालिका यांच्या सहकार्यांनं आणि सामंजस्यानं चालू राहतील त्याला खीळ बसणार नाही या दृष्टीने प्रयत्न करावेत असं या पत्रात म्हटले आहे.
गेल्या पाच महिन्यांपूर्वी राज्यात जी राजकीय मोडतोड झाली आणि गटातटांच्या कुरघोडीचं राजकारण सुरू झालं, त्याची पार्श्वभूमी देखील याला कारणीभूत असण्याची शक्यता आहे. सध्या ठाण्यात स्वातंत्र्यदिनी झेंडा कोणी लावायचा, तलावपाळीवर दिवाळीचा कार्यक्रम कोणी करायचा या गोष्टीही दुर्दैवाने न्यायालयापर्यंत जात आहेत. अशा दूषित वातावरणात संगीतादी कलाक्षेत्रामध्ये कुठलीही कोर्टबाजी नसावी आणि अन्यायकारकरीत्या संस्थेला डावलले असले तरी दीर्घ परंपरा असलेल्या राम मराठे महोत्सवाला अपशकुन होऊ नये हीच आमची समंजस भूमिका असल्याचं मराठी नाट्य परिषदेनं म्हटलं आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading