कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या मतदार नोंदणीचा दुसरा टप्पा ९ डिसेंबर पर्यंत सुरू राहणार

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मतदार नोंदणीचा दुसरा टप्पा सुरू झाला असून अद्यापपर्यंत नाव नोंदणी न केलेल्या शिक्षकांनी ९ डिसेंबर २०२२ पर्यंत मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ ७ फेब्रुवारी २०२३ रोजी संपत आहे. निवडणूक आयोगाकडून कोकण शिक्षक मतदार संघाकरीता मतदार यादीत नाव नोंदणीसाठी १ ऑक्टोबर २०२२ ते दि. ०७ नोव्हेंबर २०२२ पर्यंत  पहिल्या टप्प्यात विशेष मोहीम राबविण्यात आली होती. त्याअंतर्गत ठाणे जिल्ह्यात १९ हजार ९४६ पात्र शिक्षक मतदारांची नोंदणी झाली आहे.

भारत निवडणूक आयोग व महाराष्ट्रचे  मुख्य निवडणूक अधिकारी यांनी कोकण विभाग शिक्षक मतदार संघासाठी घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार दि. २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर२०२२ पर्यंत दुसऱ्या टप्प्यात पात्र शिक्षकांची मतदार नोंदणी सुरू आहे. ठाणे जिल्हयातील पात्र शिक्षक मतदारांची नोंदणी करण्यासाठी १४ पदनिर्देशित ठिकाणे घोषित करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सर्व उपविभागीय अधिकारी व सर्व तहसिलदार यांच्या कार्यालयाचा समावेश आहे.
माध्यमिक श्रेणी किंवा त्यावरील शैक्षणिक संस्थेत दि. ०१ नोव्हेंबर २०२२ या अर्हता दिनांकापूर्वी लगतच्या मागील सहा वर्षापैकी किमान तीन वर्षे शिक्षण सेवेत असणाऱ्या शिक्षकांना मतदार म्हणून नोंदणी करता येईल. पात्र शिक्षकांना मतदार नोंदणी करण्यासाठीची ही शेवटची संधी आहे. जास्तीजास्त शिक्षकांनी शिक्षक मतदार संघासाठी मतदार म्हणून नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी शिनगारे यांनी केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading