गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करा – महापालिका आयुक्त

गोवर या आजाराचे रुग्ण आढळल्यास त्यांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी सातही दिवस ओपीडी सुरू ठेवा. मुंब्रा परिसरात ठिकठिकाणी लसीकरणाची मोहिम हाती घेवून ज्या बालकांचे लसीकरण झाले नाही त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करा, तसेच आरोग्य केंद्रात उपचार दिले जात आहेत असा विश्वास नागरिकांच्या मनात निर्माण करा अशा सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या. मुंब्रा परिसरातील गोवर आजाराच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त श्री. बांगर यांनी कौसा रुग्णालय येथे बैठक घेतली. मुंब्रा विभागात गोवरचा प्रादुर्भाव दिसून येत असून आजपर्यत एकूण 54 रुग्ण संशयित रुग्ण आढळले आहेत, ही बाब जरी गंभीर असली तरी गोवर या आजाराबाबत नागरिकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. एक वर्षापर्यत ज्या बालकांमध्ये गोवरची लक्षणे आढळून येत आहेत त्यांची तपासणी बालरोग तज्ज्ञांमार्फत होणे आवश्यक आहे. जर बालरोगतज्ज्ञ नसतील तर वैदयकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करावी, जेणेकरुन गोवर या आजाराची तीव्रता आढळल्यास त्याच्यावर तातडीने उपचार होतील. सर्व आरोगय केंद्रामध्ये वैदयकीय तपासणीसाठी आरोगय अधिकारी ही तीन पाळयामध्ये उपलब्ध असतील अशा पध्दतीने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी सर्व वैदयकीय आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या. आशा वर्कर्सनी देखील संशयित रुग्णांवर देखरेख ठेवावी.त्यांच्याजवळ शून्य ते पाच या वयोगटातील सर्व बालकांची यादी उपलब्ध असते. आशा सेविकांनी सर्व बालकांचा पाठपुरावा करून गोवर असेल तर नागरी आरोग्य केंद्रात त्याची माहिती द्यावी. खाजगी डॉक्टरांनाही गोवरबद्दल खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गोवर सदृश लक्षणे असलेला रुग्ण आला तर त्या रुग्णाच्या नातेवाईकांचा मोबाईल नंबर आपल्या कार्यक्षेत्रातील नागरी आरोग्य केंद्राकडे लगेच द्यावा. गोवरचा प्रादुर्भाव हा फेब्रुवारीपर्यत राहू शकतो, परंतु आता जो प्रादुर्भाव वाढत आहे, त्याची साखळी तोडणे महत्वाचे आहे, यासाठी बालकांचे नियमित लसीकरण होणे गरजेचे आहे, अन्यथा ही साखळी वाढण्याचीही शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले. यासाठी विशेष लसीकरणाचे कॅम्प आयोजित करुन जास्तीत जास्त बालकांचे लसीकरण होईल या दृष्टीने नियोजन करावे, मुंब्रा येथील चारही आरोग्य केंद्रामध्ये 24 तास रुग्ण्वाहिका ठेवा, जेणेकरुन एखादा गंभीर रुग्ण आल्यास त्याला तात्काळ उपचारार्थ रुग्णालयात नेणे सोईचे होईल. गोवरचे रुग्ण शोधण्यासाठी दुसरी सर्वेक्षणाची फेरी कौसा, मुंब्रा, कळवा येथे सुरू झाली आहे. तसेच ज्यांचे लसीकरण झालेले नाही अशीही मुले आढळतील असेही बांगर यांनी नमूद केले. अंगणवाडीमध्ये येणाऱ्या बालकांसाठी त्या ठिकाणी विशेष लसीकरण शिबीर आयोजित करावे, बालक कुपोषित असेल तर त्याला रुग्णालयात दाखल करुन अतिरिकत आहार दया. अंगणवाडी सेविकांनीही घरोघरी जावून सर्वेक्षण करा अशा सूचनाही बांगर यांनी दिल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading