पं. राम मराठे स्मृती पुरस्कार डॉ. मंजिरी देव यांना, तर दीपिका भिडे-भागवत यांना युवा पुरस्कार जाहीर

पं. राम मराठे स्मृती पुरस्कार डॉ. मंजिरी देव यांना, तर दीपिका भिडे-भागवत यांना युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. ठाणे महापालिकेच्या वतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या संगीतभूषण पं. राम मराठे संगीत महोत्सवाचे यंदाचे २७वे वर्षे असून त्या निमित्ताने संगीत रसिकांना शास्त्रीय गायनाबरोबरच कथ्थक नृत्य, संगीत नाटकाची मेजवानी मिळणार आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ज्येष्ठ कथ्‌थक नृत्यांगना डॉ. मंजिरी देव यांना ‘पं. राम मराठे स्मृती पुरस्कार’, तर गायिका दीपिका भिडे-भागवत यांना ‘पं. राम मराठे स्मृती युवा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली. २ ते ४ डिसेंबरपर्यंत रंगणारा हा संगीत महोत्सव नागरिकांसाठी विनामूल्य आहे. महोत्सवाच्या प्रवेशिका शनिवारपासून दुपारी बारा वाजल्यानंतर गडकरी रंगायतन, काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे उपलब्ध होणार आहेत. या महोत्सवाचा शुभारंभ २ डिसेंबरला ‘इंडीरुट्स’ या आगळ्या वेगळ्या प्रयोगाने होणार आहे. त्यात सायली तळवलकर (गायन), अभिषेक भुरूक (ड्रम्स), कल्याण पांडे (तबला), रोहित कुलकर्णी (की बोर्ड), संकेत नाशिक (गिटार) हे कलाकार सहभागी होतील. पाठोपाठ, पं. राम मराठे स्मृती पुरस्काराचे वितरण होईल. गेली ४५ वर्षे कथ्थक या नृत्यप्रकाराची अतुलनीय साधना करून आजवर कथ्थक नृत्याच्या अनेक शिष्या घडविणाऱ्या डॉ. मंजिरी देव यांना संगीतभूषण पं. राम मराठे पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. रोख रुपये ५१,०००/- आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तर गेली २० वर्षे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेणाऱ्या आणि १० वर्षे अध्यापनाचे काम करीत संगीताची साधना करणाऱ्या दीपिका भिडे- भागवत यांना पं. राम मराठे युवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रोख रुपये २५०००/- आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. त्यानंतर बेगम परवीन सुलताना यांचे गायन होणार असून त्यांना शादाब सुलताना खान या साथसंगत करणार आहेत. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ३ डिसेंबर रोजी विधा लाल यांचे कथ्थक नृत्य सादरीकरण असून त्यानंतर शोभा चौधरी, अपर्णा केळकर, अविराज तायडे यांची ठुमरी/ दादरा/ भजन यांची उपशास्त्रिय संगीत मैफल होईल. तर रात्री प्रख्यात सरोद वादक पं. तेजेंद्र मजुमदार, कोलकता यांचा कार्यक्रम होणार आहे. ४ डिसेंबर रोजी ठाणेकरांची कला साधना या कार्यक्रमात, निधी प्रभू (कथ्थक नृत्य), कल्याणी साळुंखे (गायन) आणि मुकूंद मराठे (गायन) हे कलाकार सहभागी होतील. तर दुपारी नाटक संगीत सौभद्र चा प्रयोग होणार आहे. गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाटय सेवा ट्रस्ट, पुणे प्रस्तूत, आणि मराठी रंगभूमी, पुणे निर्मित हे नाटक आहे. या महोत्सवाची सांगता पं. शिवकुमार शर्मा यांना संगीतमय आदरांजलीचा कार्यक्रम होईल. त्यात पद्मश्री पं. सतीश व्यास (संतूर), पं. मुकूंदराज देव (तबला), विवेक सोनार (बासरी), अंबी सुब्रमण्यम (व्हायोलिन), राजेश श्रीनिवासन (मृदुंगम) यांची आगळी वेगळी मैफिल रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading