ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायत परिसरात मनाई आदेश लागू

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या काही ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका होणार आहेत. यामुळे या ग्रामपंचायत परिसरात व ग्रामपंचायत निवडणुकीचे कामकाज चालणाऱ्या अंबरनाथ, कल्याण तहसीदार/पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात 23 डिसेंबर पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला असल्याची माहिती ठाणे शहर विशेष शाखेचे पोलीस उप आयुक्त श्रीकांत परोपकारी यांनी दिली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ऑक्टोंबर 2022 ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या तसेच नव्याने स्थार्पित ग्रामपंचायतीच्या (सदस्यपदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 2 भिवंडी अंतर्गत कोनगाव पो. स्टे. हद्दीतील कोनगांव, नारपोली पो.स्टे. हद्दीतील कशेळी व कोपर, भोईवाडा पो.स्टे. हद्दीतील कारीवली तसेच निजामपूरा पो. स्टे. हद्दीतील कांबे ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.  तसेच पोलीस अधिक्षक, ठाणे ग्रामीण यांचे अधिपत्याखालील गावांतील ग्रामपंचायत निवडणुकीचे कामकाज भिवंडीतील माता वऱ्हाळदेवी, मंगलभवन, कामतघर येथे तसेच पोलीस अधिक्षक ठाणे ग्रामीण यांच्या अधिपत्याखालील कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे कामकाज कल्याण पंचायत समिती कार्यालय येथे होणार आहे. या परिसरात आचारसंहिता लागू झाली असल्याने निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायत परिसरात तसेच निवडणुकीचे कामकाज चालणाऱ्या शासकीय कार्यालयाच्या परिसरात हा मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. हा मनाई आदेश २८ नोव्हेंबर रोजी 00.01 वा. पासून ते 23 डिसेंबर रोजी रात्री १२ पर्यंत अंमलात राहणार आहे.

नामनिर्देशनपत्रे स्विकारण्याच्या ठिकाणी निवडणूक संबंधाने राजकीय पक्ष आपआपले शक्ती प्रदर्शन करण्यासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस मोठ्या प्रमाणावर एकत्र येण्याची शक्यता आहे. या ठिकाणांच्या प्रांगणात कॉर्नर मिटींग, सभा, पत्रकार परिषद इत्यादी सारखे कार्यक्रम घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेमध्ये अडथळा येवून सदर ठिकाणची शांतता भंग होण्याची दाट शक्यता आहे, अशा ठिकाणांच्या कार्यालयाच्या 100 मीटर चहुबाजुकडील परिसरात कोणत्याही पक्षाचे/ संघटनेचे पदाधिकारी / कार्यकर्ते आणि प्रतिनिधी किंवा इतर व्यक्ती यांना निवडणुकीशी संबंधित सभा/बैठक/पत्रकार परिषद आदी कार्यक्रम घेण्यास या आदेशाने प्रतिबंध करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे नामनिर्देशन अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवार व त्याच्या सोबत दोन व्यक्ती यांनाच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षामध्ये प्रवेश देण्यात येईल. त्याचप्रमाणे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास येणाऱ्या उमेदवारास नमुद ठिकाणच्या कार्यालयाच्या 100 मीटर चहुबाजुकडील परिसरात फक्त तीन वाहने आणण्याची परवानगी देण्यात आली असून तीन पेक्षा अधिक वाहने त्या कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात आणण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: