नफरत छोडो, संविधान बचाओ अभियानाला ठाण्यात सुरुवात

ठाण्यात समता विचार प्रसारक संस्था, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, श्रमिक जनता संघ, व्यसन मुक्ति अभियान, स्वराज इंडिया,भारतीय महिला फेडरेशन आदि समविचारी संस्था संघटनांनी नफरत छोडो, संविधान बचाओ या अभियानांतर्गत रॅलीचे आयोजन केले होते. देशभरातील जन आंदोलनांनी ९ ऑगस्टला जाहीर केल्याप्रमाणे २ ऑक्टोबर गांधी जयंती ते १० डिसेंबर मानवाधिकार दिन या काळात देशभर नफरत छोडो, संविधान बचाओ हे अभियान होत असून त्याची ठाण्यात आज सुरुवात करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालया जवळील डॅा. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून सुरु झालेल्या या रॅलीची सांगता तलावपाळीवरील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ झाली. यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रमिक जनता संघाचे जगदीश खैरालिया यांनी सांगितलं की ७५ वर्षांनंतरही देशात धर्माधर्मातील, जातीपातीतील विद्वेष संपला नाहीये, दलितांवरील, स्त्रियांवरील अन्यायात दिवसेंदिवस वाढ होते आहे, काही वेळा सरकारकडून या वृत्तीला खतपाणी घातले जात आहे असे दिसून येते. या संदर्भात आम्ही जनतेपाशी जाऊन त्यांच्याशी संवाद करणार आहोत. यासाठी देशातील सुमारे ५०० जिल्ह्यात स्थानिक स्तरावर विकेंद्रीत स्वरुपात किमान ७५ किमी च्या पदयात्रा, संवाद सभा आदि कार्यक्रम नियोजित केले आहेत. या अभियानाची सुरुवात ठाण्यात आजच्या रॅलीने केली आहे. ठाणे जिल्ह्यात७५ कि.मी.ची पदयात्रा काढली जाणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. सर्व ठाणेकरांनी या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading