सुदृढ, पारदर्शक, बळकट लोकशाहीसाठी तरुणांनी मतदार यादीत नाव नोंदवावे – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

मतदार यादीत नाव येण्यासाठी काय करावे लागेल, कोणता फॉर्म भरावा लागेल, अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाईन, मतदार यादीत नावासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील, अर्ज कुठे करावा, नाव नोंदणी अर्ज सादर करणे ते ओळखपत्र मिळणे या दरम्यान किती वेळ लागतो, मत दिलेल्या उमेदवारांने त्या मताचा गैरवापर केला तर काय करायचे ? अशा तरुणाईला पडलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरे आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडून ठाण्यातील विद्यार्थ्यांनी जाणून घेतली. समृद्ध, सुजाण, बळकट आणि पारदर्शक लोकशाही प्रक्रियेसाठी तरुणांनी मतदार यादीत नाव नोंदणी करून मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन यावेळी देशपांडे यांनी केले.
महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी, ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय आणि बेडेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत कशी होते मतदार नोंदणी या परिसंवादात श्रीकांत देशपांडे, जिल्हाधिकारी तसंच अधिकारी अधिकारी सहभागी झाले होते. विशेष पुनरीक्षण कार्यक्रम म्हणजे काय, मतदार नोंदणी करणे का आवश्यक आहे, 17 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आगाऊ मतदार नोंदणी करता येते का अशा अनेक शंकांची उत्तरे यावेळी मान्यवरांनी दिली. महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थी-विद्यार्थींनीनी मतदार नोंदणी जनजागृतीविषयी पथनाट्य सादर केले. महाविद्यालयात उभारलेल्या मतदार नोंदणी केंद्राचे उद्घाटन देशपांडे यांच्या हस्ते झाले.
भारताची लोकशाही व्यवस्था ही जगातील मोठी लोकशाही आहे. ही लोकशाही टिकविण्याची आणि अधिक सुदृढ करण्याची जबाबदारी ही आजच्या तरुण पिढीवर आहे. पारदर्शक निवडणुका हा या लोकशाहीचा गाभा आहे. त्यासाठी मतदार याद्या निर्दोष असणे आवश्यक आहे. ही यादी निर्दोष, पारदर्शक, परिपूर्ण आणि अधिक अचूक असावी, कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. वंचित, बेघर, तृतीयपंथीय, महिला, युवक अशा घटकांच्या हातात लोकशाहीच्या नाड्या आहेत. तेच जर या प्रक्रियेच्या बाहेर असतील तर लोकशाही बळकट कशी होणार. म्हणून तरुणांना, वंचित समाजातील घटकांना प्रवाहात आणण्यासाठी हा कार्यक्रम महत्वाचा आहे.
विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील दुरुस्ती अशी अनेक कामे करण्यात येत आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत युवा, बेघर, तृतीयपंथीय, देहविक्रय करणाऱ्या महिला, भटके विमुक्त, वंचित घटकांची मतदार यादीत नोंद करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच मतदार नोंदणीसाठी आलेल्या अर्जाची तपासणीसाठी विशेष यंत्रणा राबविण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
सुदृढ आणि बळकट लोकशाहीसाठी या प्रक्रियेत तरुणांना सामावून घेण्यात येत आहे. महाविद्यालयांमध्ये मतदान नोंदणी केंद्राची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच समाज माध्यमाद्वारे जनजागृती करण्यात येत असून मिम्स, लोकशाहीचा भोंडला असे विविध स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. जास्तीत जास्त युवा वर्गाला मतदार यादीत नाव नोंदणी करता यावी, यासाठी वर्षातून चार वेळा आगाऊ नोंदणी करण्याची सुविधा देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेऊन 18 वर्ष पूर्ण न झालेल्या तरुणांनाही नाव नोंदविता येणार आहे. मात्र, त्यांच्या नावाचा समावेश 18 पूर्ण झाल्यावर यादीत होणार असल्याचेही देशपांडे यांनी सांगितले.
मतदान का करावे, या एका विद्यार्थ्याच्या प्रश्नावर जिल्हाधिका-यांनी सांगितलं आपल्या जाणतेपणा, सुजाणपणाचा भाग असेल तर या प्रश्नाचे उत्तर मतदान का करायचे नाही, यातच सामावले आहे. सैनिक ज्या प्रमाणे देशाचे संरक्षण करण्याचे राष्ट्रीय कर्तव्य समजतो, त्याप्रमाणेच प्रत्येकाने मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य समजावे. चांगले प्रतिनिधी संसदेत/विधानसभेत पाठविण्यासाठी, पुढील पिढीसाठी लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी, बळकट लोकशाही हवी असेल तर मतदान करणे आवश्यक आहे. त्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. ज्या प्रमाणे तरुण वाहन परवाना काढण्यासाठी सजग असतो त्याप्रमाणेच त्याने मतदार यादीत नाव येण्यासाठीही सजग असले पाहिजे.
या परिसंवादा दरम्यान महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विद्यार्थ्यांना मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आणि मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शिनगारे यांनी केले. विद्यार्थी प्रतिनिधी अभिषेक नेमाणे यालाही मित्र, नातेवाईक यांच्या नोंदणीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन श्री. शिनगारे यांनी केले. यावेळी उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनींनी स्वतःचे नाव नोंदणी करून मित्र, सहकारी, नातवाईकांनाही मतदार नोंदणी करण्यासाठी सहकार्य करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला. यावेळी महाविद्यालयातील अंध विद्यार्थ्यांनीही परिसंवाद भाग घेऊन मतदार नोंदणी प्रक्रिया समजून घेतली.
विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत जोशी बेडेकर महाविद्यालयात मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या केंद्रातून विद्यार्थ्यांना अर्ज वाटप, नोंदणीसाठी मदत केली जात आहे. या ठिकाणाहून महाविद्यालयातील 1200 विद्यार्थ्यांनी अर्ज नेले असून त्यातील 400 जणांनी अर्ज सादर केले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading