२ लाख रूपयांची खंडणी मागणा-या दोघांना अटक

एका शैक्षणिक संस्थेच्या संचालकास शाळेत केलेल्या अनधिकृत बांधकामाची तक्रार करण्याची तसंच जीवे ठार मारण्याची धमकी देऊन २ लाख रूपयांची खंडणी मागणा-या दोघांना पोलीसांनी अटक केली आहे. नारपोली येथे बॉम्बे केम्ब्रिज स्कूल असून या शाळेत पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचं नुतनीकरण करण्यात आलं. दिलीप पाटील नावाच्या व्यक्तीनं या शाळेचे सचिव राकेश शेट्टी यांना धमकावले. त्यावेळी त्यांनी त्यांचे सचिव प्रदीप पाटील यांना या प्रकरणी चर्चा करण्यास सांगितलं. दिलीप पाटील यांनी प्रदीप पाटील यांना तुम्ही केलेले अनधिकृत बांधकाम अधिकृत करून घ्यायचं असेल तर २ लाख रूपये द्यावे अथवा महापालिकेकरवी तुम्हांला नोटीस काढली जाईल आणि या प्रकरणी पोलीसांना माहिती दिल्यास तुमच्या जीवाचं बरंवाईट होईल असं धमकावलं. पण याप्रकरणी कोणतीही खंडणी द्यायची नसल्यामुळं या दोघांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. हे प्रकरण खंडणी विरोधी पथकाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आलं. त्यांच्या सूचनेनुसार पुन्हा दिलीप पाटील यांच्याशी प्रदीप पाटील यांनी चर्चा केली आणि महापालिकेकडे तक्रार न करण्यासाठी १ लाख रूपये देण्याचं ठरलं. हे पैसे ठाणे रेल्वे स्थानकासमोरील सदानंद हॉटेल येथे देण्याचे ठरले. खंडणी विरोधी पथकानं वेशांतर करून दिलीप पाटील आणि विकास कांबळे अशा दोघांना प्रदीप पाटील यांच्याकडून एक लाख रूपये स्वीकारताना अटक केली अशी माहिती पोलीसांतर्फे देण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading