कल्याणमध्ये 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी ठाणे ग्रंथोत्सवाचे आयोजन

ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांमध्ये वाचन संस्कृतीची वाढ व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरणाअंतर्गत उच्च- तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, ठाणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने कल्याणमधील पारनाका येथील आनंदी गोपाळ सभागृह, अभिनव विद्यामंदिर येथे येत्या शनिवारी आणि रविवारी ठाणे ग्रंथोत्सव-2022 चे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथप्रेमी नागरिक, विद्यार्थी, साहित्यिकांनी या संमेलनात उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा ग्रंथोत्सव समितीचे अध्यक्ष अशोक शिनगारे यांनी केले आहे. ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ प्राप्त व्हावेत तसेच प्रकाशक आणि ग्रंथ विक्रेता यांना ग्रंथ विक्रीसाठी एकाच ठिकाणी आवश्यक ती सुविधा उपलब्ध व्हावी, ग्रंथांचा प्रचार, प्रसार व्हावा या उद्देशाने हा ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या ग्रंथोत्सवाच्या निमित्त विविध साहित्यिक- सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रंथ प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजनही करण्यात आले आहे. ग्रंथोत्सवाची सुरुवात शनिवारी ग्रंथ दिंडीने होणार आहे. सकाळी 11 वाजता ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. याच दिवशी दुपारी 2.30 वाजता ‘समाज माध्यमांचे वाचक चळवळीवरील परिणाम’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. त्यानंतर दु. 4 वाजता कथाकथनाचा कार्यक्रम होणार असून अध्यक्षस्थानी चांगदेव काळे असणार आहेत. प्राची गडकरी, करुणा कल्याणकर, सुरेश पवार हे यात सहभागी होणार आहेत. दुसऱ्या दिवशी 20 नोव्हेंबर रोजी महिलांचे मराठी साहित्यातील योगदान याविषयावरील परिसंवादात चंद्रशेखर भारती, प्रा. ऋचा खापर्डे हे सहभागी होणार आहेत. दुपारी 2.30 वा. काव्य संमेलन होणार आहे. या काव्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे असणार आहेत. यात सुरेखा गावंडे, स्वाती नातू, सुरेखा गायकवाड, दीपश्री इसामे, आदित्य दवणे, संकेत म्हात्रे, प्रकाश धानके, कृष्णतेज, शितल पाचर्णे, विजय गायगवळी, संदीप राऊत, गोविंद नाईक, माधव डोळे, संदेश ढगे, किरण येले हे सहभागी होणार आहेत. सायंकाळी 4 वाजता होणाऱ्या समारोप कार्यक्रमात ठाणे जिल्ह्यातील आदर्श ग्रंथपालांचा, उत्कृष्ठ ग्रंथालयांचा सत्कार करण्यात येणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading