ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 24 हजार 904 प्रकरणे निकाली

जिल्ह्यात झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयातील प्रलंबित 22 हजार 393 आणि 2 हजार 511 दावा दाखल पूर्व प्रकरणे अशी मिळून एकूण 24 हजार 904 प्रकरणे सामंजस्याने तडजोड होऊन निकाली निघाली आहेत. या लोकअदालतीमध्ये एकूण 13,23,04,99,168 रक्कमेची तडजोड झाली असल्याची माहिती ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सुर्यवंशी यांनी दिली. जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये 12 नोव्हेंबर रोजी प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अभय मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली “राष्ट्रीय लोकअदालत चे आयोजन करण्यात आले होते. न्यायालयातील वाढता ताण लक्षात घेता प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे आवश्यक आहे. केवळ प्रलंबित प्रकरणे निकाली काढल्याने पक्षकारांस तात्काळ न्याय मिळतो आणि न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा जलद गतीने निपटारा होतो. यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या अदालतीमध्ये प्रकरणे ठेवण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील विविध न्यायालयांमधील प्रलंबित आणि दावा दाखलपूर्व प्रकरणांमध्ये तडजोड होऊन ती निकाली निघाली असल्याचे सुर्यवंशी यांनी सांगितलं. ठाण्यातील मोटार अपघात दावा न्यायाधीकरणाकडील प्रलंबित प्रकरणांमध्ये मयत व्यक्तीच्या वारसांना जास्तीत जास्त मोटार अपघात नुकसान भरपाई मंजुरीसाठी जिल्हा न्यायाधीश पी. एस. विठलाणी यांनी पॅनल प्रमुख म्हणून विशेष प्रयत्न केले. 265 मोटार अपघात प्रकरणांमध्ये तडजोड होऊन पिडितांना एकूण 21 कोटी 90 लाख 69 हजार 675 रुपये इतकी भरपाई मंजूर करण्यात आली आहे. यापैकी ठाणे मुख्यालयातील 204 प्रकरणांमध्ये 18 कोटी 21 लाख 12 हजार इतकी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. भिवंडी निजामपूर महापालिका हद्दीतील जागेच्या मावेजाची 17 प्रकरणे सन २००० पासून प्रलंबित होती. या प्रकरणांवर ठाणे दिवाणी न्यायालयातील दिवाणी न्यायाधीश एस. एन. शाह यांच्या पॅनेलने तडजोड घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. या सर्व प्रकरणांत लोकअदालतमध्ये तडजोडीस यश प्राप्त झाले असून 22 वर्ष जुनी भूसंपादन प्रकरणे कायमची निकाली निघाली आहेत. विशेष बाब म्हणजे हक्कदार आणि मुखत्यारधारक काझी हे ९७ वर्ष वयोवृध्द आहेत. या प्रकरणाच्या तडजोडीसाठी भिवंडी येथील काझी वकील, शासनातर्फे वकील विवेक कडू आणि महापालिकेचे वकील अरुण नवरे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.
लोकअदालतीमधील ठळक बाबी
• प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात ठाणे जिल्हा राज्यात अग्रेसर
• या राष्ट्रीय लोकअदालतध्ये इलेक्ट्रॉनिक साधनांचा मोठ्या प्रमाणात वापर.
• कॅनडा, अमेरिकेमधील पक्षकारांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थिती दर्शवून सहभाग नोंदविला.
• वैवाहिक प्रकरणे तडजोडीस मोठ्या प्रकरणात यश, अनेक संसार जुळले.
• १० ते १५ वर्ष जुने असंख्य प्रकरणे निकाली निघाली.
• २२ वर्ष जुन्या भूसंपादनाच्या एकूण १७ प्रकरणांत तडजोड होऊन भूधारकास नुकसान भरपाई देण्यात आली आहे.
• मोटार अपघातांच्या २६५ प्रकरणांमध्ये तडजोडीस यश.
• इफ्फ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीच्या उपाध्यक्ष सनी भंडारी, व्यवस्थापक प्रदीप मोहन यांनी व्यक्तिशः उपस्थित राहून तडजोड प्रकरणातील 57 लाख 50 हजाराची नुकसान भरपाई दिली.
• घरातील कर्ता पुरुषाच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नी व मुलीस रु.८४,९५,०००/- रक्कम तडजोड मंजूर करण्यात आली.
• मोटार अपघात प्रकरणात ६० लाख रुपये नुकसान भरपाई रक्कम मंजूर.
• भिवंडी न्यायालयातील 25 वर्ष जुना एक दिवाणी वाद, 11 वर्ष जुने दोन दिवाणी वाद आणि 10 वर्षे जुनी चार दिवाणी वाद समझोत्याने निकाली यश

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading