जागतिक शौचालय दिनानिमित्त जिल्हा हागणदारी मुक्त ठेवण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी पुढाकार घेण्याचे जिल्हा परिषदेचं आवाहन

जागतिक शौचालय दिनानिमित्त जिल्हा हागणदारी मुक्त ठेवण्यासाठी 3 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत स्वच्छतेचे विविध उपक्रम राबविण्याबाबत सर्व ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे. 19 नोव्हेंबर हा दिवस जागतिक शौचालय दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यासंदर्भात जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.त्यावेळी त्यांनी हे आवाहन केलं. या मोहिम काळात ज्या नागरिकांनी शासनाच्या संकेतस्थळावर शौचालयाची मागणी नोंदवली असेल त्या नागरिकांच्या नोंदींची ग्रामपंचायतींकडून तातडीने पडताळणी करण्यात येणार आहे. पडताळणीनंतर ज्या नागरिकांच्या मागणीचा स्विकार होईल, त्यांना तातडीने शौचालय मंजूर केले जाणार आहे. तसेच ज्या मागण्या नाकारल्या जातील, त्याचा कारणासह संदेश संबंधित नागरिकांना जाणार आहे. यामुळे सर्व वाढीव कुटुंबांना शौचालय सुविधा मिळण्यास गती मिळणार आहे. सर्व सार्वजनिक शौचालयांचा नियमित वापर करण्यासाठी तसेच तेथील स्वच्छता ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्या कुटुंबांनी मंजूर केलेल्या शौचालयांचे बांधकाम पूर्ण केले आहे, त्यांना अनुदानासाठी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आणि पात्र कुटुंबांच्या बँक खात्यामध्ये असे अनुदान मोहिम कालावधीत वर्ग करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. जागतिक शौचालय दिन 2022 साठी शौचालय आणि भूजल अशी संकल्पना देण्यात आली असल्याने या कालावधीत मैलागाळ व्यवस्थापनासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये सुरूवातीच्या काळात बांधण्यात आलेल्या सर्व एक खड्डा शौचालयांचे दोन खड्डा शौचालयांमध्ये रुपांतर करण्यासाठी मोहिम हाती घेण्यात येणार असून या अनुषंगाने सर्व गटविकास अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. गटविकास अधिकाऱ्यांमार्फत सर्व गावांमध्ये याबाबत कार्यवाही होणार असल्याने एक खड्डा शौचालय असलेल्या कुटुंबांनी एक खड्डा शौचालयाचे रुपांतर दोन खड्डा शौचालयात करुन घ्यावे. यासाठी ग्रामपंचायती त्यांच्याकडील 15 व्या वित्त आयोगाच्या स्वच्छतेसाठीच्या बंधीत निधीपैकी 10 टक्के रक्कम खर्च करु शकतील. याशिवाय ग्रामपंचायती स्वनिधी, स्वयंसेवी संस्थांकडून प्राप्त अर्थसाह्य, सीएसआर इ. मार्गांनी ही कामे करू शकतील असेही जिंदल यांनी सांगितले. ज्या कुटुंबांना शौचालय भरल्याने त्यातील मैलागाळाचे व्यवस्थापन करावयाचे असेल, त्यांनी आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा असे आवाहनही जिंदल यांनी केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading