स्वराज अभियानाचे प्रदेश उपाध्यक्ष संजीव साने यांचे निधन

सामाजिक कार्यकर्ते आणि स्वराज अभियानाचे प्रदेश उपाध्यक्ष संजीव साने यांचे आज ठाण्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. साने यांनी १९७६ मध्ये राष्ट्र सेवा दलामधून आपल्या कामाला सुरूवात केली. एस एम जोशी यांच्या नेतृत्वाखाली पूर्णवेळ राष्ट्र सेवा दलाचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी वर्षभर काम केले. नंतर १९८० पर्यंत ते राष्ट्र सेवा दलात काम करत होते. १९८२ च्या दरम्यान मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात ते सहभागी होते. समता युवा संघटन, समाजवादी युवक दल सातारा, आणि सत्यशोधक समाजवादी आंदोलन येवला यामध्येही त्यांचा सहभाग होता. साने गुरूजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट, वडघर, १९७७ मध्ये आंध्रमधील वादळ, गुजरातमधील मोरवी आणि किल्लारी भूकंपग्रस्तांनाही त्यांनी मदत केली. म्युनिसिपल लेबर युनियन, मराठवाडा लेबर युनियन, शोषित जन आंदोलन या संस्थांशी ते संलग्न होते. दाभोळ पॉवर कंपनीकडून त्यांना फेलोशिप मिळाली होती. ठाण्यात सिटीझन फोरमची स्थापना, ठाणे मतदाता जागरण अभियानाची स्थापना केली. आम आदमी पक्षातर्फे २०१४ मध्ये ठाण्यातून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी स्वराज इंडिया पार्टीची स्थापना केली होती. त्यांना एस जोशी अवॉर्ड, निळू फुले अॅवॉर्ड तसंच डॉ. बी एल भोळे अॅवॉर्ड मिळाले होते. एक सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे समाजवादी चळवळीचा एक लढवय्या कार्यकर्ता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी नीता आणि मुलगा निमिश हे दोघे आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading