“नो कॅश काऊंटर” असणारे मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे रुग्णालय नागरिकांसाठी वरदान ठरेल: पालकमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे शहरातील श्रीनगर, वागळे इस्टेट या परिसरात नव्याने कार्यान्वित करण्यात आलेले “नो कॅश काऊंटर” असणारे सुपरस्पेशॅलिटी उपचार व शस्त्रक्रियेच्या अद्ययावत सुविधांयुक्त मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे रुग्णालय हे नागरिकांसाठी वरदान ठरेल असा विश्वास राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केला. ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व प्लॅटिनम हॉस्पिटल प्रा.लि. च्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या मातोश्री गंगुबाई संभाजी रुग्णालयाचा लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मातोश्री गंगुबाई संभाजी रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा आज ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे,लता एकनाथ शिंदे आणि संभाजी शिंदे यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी बोलताना पालकमंत्री शिंदे म्हणाल की, वागळे, श्रीनगर परिसरातील नागरिकांना या हॉस्पिटलच्या माध्यमातून अद्ययावत सेवासुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे. प्लॅटिनम रुग्णालयाच्या सहकार्याने या ठिकाणी १०० बेडस् उपलब्ध करण्यात आले आहे. या रुग्णालयात सुपरस्पेशॅलिटी उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत, यामध्ये हृदयविकारासंबंधी तपासणी व उपचार, युरोलॉजी व इतर वैद्यकीय सेवांचा समावेश आहे. या रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत 'नो कॅश काऊंटर' पद्धतीनुसार रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. तसेच शस्त्रक्रिया करण्याअगोदरची ओ.पी.डी सेवा आणि वैद्यकीय चाचण्या देखील विनामूल्य करण्यात येणार आहेत याचा फायदा येथील स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा म्हणाले की, वागळे इस्टेट व आजूबाजूच्या विभागातील नागरिकांना सुपरस्पेशॅलिटी वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी या दृष्टीकोनातून या रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, शस्त्रक्रिया गृहे तयार करण्यात आलेली आहेत. पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यापूढे आम्ही सर्व ठाणेकरांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा देण्यासाठी नेहमीच कटिबद्ध राहू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागास आयसीआयसीआय बँकेने सीएसआर फंडातून एक पिडीयाट्रिक व एक ॲडल्ट कार्डिॲक रुग्ण्वाहिका उपलब्ध करुन दिली आहे. या रुग्णवाहिकांचे लोकार्पण देखील आज पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. सदर रुग्ण्वाहिकांमुळे अत्यवस्थ रुग्णांना संदर्भसेवा देणे सोईस्कर होणार आहे.

‘टीबीमुक्त ॲप तयार करणारी ठाणे ही राज्यातील पहिली महापालिका” ठाणे महानगरपालिका हद्दीतील क्षयरोगाचे रुग्ण लवकर बरे व्हावेत यासाठी महापालिकेच्या माध्यमातून क्षयरुग्णांचे निदान व त्यावरील उपचार हे मोफत केले जात आहेत. क्षयरुग्णांसाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून टीबीमुक्त ॲप तयार करण्यात आले असून हे ॲप तयार करणारी ठाणे ही राज्यातील पहिली महापालिका आहे. या ॲपचे देखील आज पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या ॲपच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिका प्रयोगशाळेतून टीबी चाचणीचा अहवाल तयार झाल्यावर त्वरीत रुग्णाच्या मोबाईलवर त्याच दिवशी एसएमएस द्वारे उपलब्ध होणार आहे. तसेच रुग्णांचा चाचणी अहवाल, रुग्ण ठाणे महानगरपालिकेमधुन घेत असलेल्या औषधोपचाराची माहिती, जवळच्या ठामपा क्षयरोग मोफत उपचार केंद्रांची माहिती उपलब्ध होणार आहे. ठाणे महानगरपालिका आरोग्य विभागाकडील नोंदणीकृत खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांना सुद्धा ठाणे महानगरपालिकेत औषधोपचार घेणाऱ्या टीबी रुग्णाचे चाचणी अहवाल या ॲपवार पाहता येणार आहेत. क्षयरोग चाचणी व उपचाराच्या पाठपुराव्याचे नोटिफिकेशन अलर्ट तसेच क्षयरोगावरील जनजागृतीपर माहिती व व्हिडीओ या ॲपवर रुग्णांना पाहता येणार आहेत.

हायराईझ फायर फाईटिंग व्हेईकल ठाणे अग्निशमन दलाच्या ताफ्यात ठाणे शहरात वाढत असलेल्या उंच इमारती व त्या ठिकाणी निर्माण होणारी आपत्कालीन परिस्थिती व त्या परिस्थ‍ितीला तोंड देण्यासाठी ठाणे अग्निशमन दलाच्या वाहन ताफ्यामध्ये नव्याने अत्याधुनिक 'हाय राईझ फायर फायटिंग व्हेईकलचा' समावेश करण्यात आला असून या हायराईझ फायर फाईटिंग व्हेईकलचे लोकार्पण देखील आज पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बाळकुम अग्निशमन केंद्र येथे करण्यात आले. या फायर वाहनांचा अग्निशमन वाहन ताफ्यात समावेश झाल्याने अग्निशमन विभागाची कार्यक्षमता वाढणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading