युवा सेनेतील ठाण्यातील सैनिकही खंडणीखोरी करत असल्याचा धक्कादायक प्रकार

युवा सेनेतील ठाण्यातील सैनिकही खंडणीखोरी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विवियाना मॉलनजिक केल्या जात असलेल्या बांधकामासाठी लागणारे रेडीमिक्स कॉन्क्रीटचे साहित्य पुरवणा-याला खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी तिघा युवा सैनिकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विरल शहा, उमेश अगरवाल, देवेंद्र साळवी यांना प्रत्येक रेडीमिक्स ट्रकच्या मागे १२०० रूपयांची खंडणी हवी होती. या बांधकामासाठी लागणारे रेडीमिक्स पुरवण्याचं काम महाराष्ट्र सेल्स कॉर्पोरेशनला मिळाले होते. त्यानुसार परवेझ अन्सारी यांनी रेडीमिक्स पुरवण्याला सुरूवात केली होती. अन्सारींचा चालक रेडीमिक्स कॉन्क्रीट नेत असताना त्यांचा ट्रक देवेंद्र साळवीनं अडवला म्हणून परवेझ अन्सारी त्या ठिकाणी गेले असता या तिघांनी त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. दुस-या दिवशीही असाच ट्रक अडवण्यात आला. रेडीमिक्स कॉन्क्रीट टाकायचं असेल तर प्रत्येक गाडीमागे १२०० रूपये द्यावे लागतील अशी दमदाटीही करण्यात आली. तिस-या दिवशीही ट्रक आला असता हा ट्रक अडवून साळवी आणि त्याच्या साथीदारांनी ट्रक चालकाला मारहाण करत ट्रकच्या काचा फोडल्या. या सा-या प्रकाराची व्हीडीओ आणि संभाषणाची क्लिप पोलीसांना सादर केल्यानंतर पोलीसांनी या तिघांविरोधात खंडणी, धमकी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. उमेश अगरवाल हा ओवळा-माजिवडा मतदारसंघातील युवा सेनेचा पदाधिकारी असून त्याचा साथीदार देवेंद्र साळवीनं याच खंडणी चोरीच्या प्रकरणात शिवसेनेच्या बड्या नेत्याच्या भावालाही अश्लील शिवीगाळ केल्याची क्लीप व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading