दिव्यामधील रस्ता रूंदीकरणाच्या निषेधार्थ रहिवाशांचं सोमवारी उपोषण

ठाणे महापालिका दिव्यामध्ये चुकीच्या पध्दतीनं रस्ते रूंदीकरण करत असल्याच्या निषेधार्थ रहिवासी येत्या सोमवारी उपोषणाला बसणार आहेत. दिवा शहरातील आगासन जंक्शन ते दिवा रेल्वे स्थानक पूर्व या रस्त्याचं रूंदीकरण आणि मजबुतीकरण होणार आहे. या रूंदीकरणासाठी दिव्यातील २२ इमारतींवर कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई चुकीची असल्याच्या निषेधार्थ हे रहिवासी येत्या सोमवारी उपोषणास बसणार आहेत. आयुक्तांचा आदेश येण्यापूर्वीच स्थानिक शिवसेना नगरसेवक आणि पालिका अधिका-यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता जबरदस्तीनं इमारती खाली करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. त्याला दिव्यातून विरोध झाल्यानंतर ही कारवाई थंड झाली. पण पालिका आयुक्तांनी काल पुन्हा कारवाई करण्याचे आदेश दिल्यानं रहिवासी आक्रमक झाले आहेत. दिवा रेल्वे स्थानक रस्ता रूंदीकरण आणि दुस-या टप्प्यात होणारे आगासन फाटक ते दिवा स्टेशन पूर्व रूंदीकरणात हजारो दिवावासिय बेघर होणार आहेत. या रूंदीकरणाचा फायदा देसाई-पडले या ठिकाणी सुरू असलेल्या मोठ्या गृहसंकुलांना होणार असून ठाणे महापालिका दिव्यातील सर्वसामान्यांना बेघर करून धनदांडग्या बांधकाम व्यावसायिकांचे हित जपत असल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. प्रस्तावित रस्ता रूंदीकरणातील सीमांकन कोणत्या आधारावर करण्यात आलं आहे याचीही चौकशी करावी अशी रहिवाशांची मागणी आहे. या सर्व गोष्टींच्या निषेधार्थ आणि अन्यायकारक रस्ता रूंदीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी सोमवारी हे उपोषण केलं जाणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading