नववर्षात सुट्ट्यांची चंगळ – दा. कृ. सोमण

येत्या मंगळवारपासून सुरू होणा-या नववर्षात काय होणार आहे याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे. २०१९ मध्ये ९ वर्षांनी होणारं कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे. यावर्षी फक्त तीनच सुट्ट्या रविवारी येत असल्यानं सुट्ट्यांची चंगळ असेल अशी माहिती पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. नूतन वर्षी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी येणार असल्यानं दिवाळी फक्त चारच दिवस असेल. नववर्षात ९ महिने विवाह मुहुर्त असल्यानं विवाहोच्छुकांसाठी ही आनंदाची बातमी असल्याचं सोमण यांनी सांगितलं. नववर्ष हे लीप वर्ष नसल्यानं ३६५ दिवसांचेच राहणार आहे. २०१९ या नूतन वर्षात ३ सूर्यग्रहणं, २ चंद्रग्रहणं अशी एकूण ५ ग्रहणं होणार आहेत. त्यापैकी १६ जुलैचं खंडग्रास चंद्रग्रहण आणि २६ डिसेंबरचे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे. यापूर्वी १५ जानेवारी २०१० चे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसलं होतं. ११ नोव्हेंबरला होणारं बुधाचं अधिक्रमण भारतातून दिसणार नाही. २१ जानेवारी आणि १९ फेब्रुवारीला सुपरमून दिसणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, लक्ष्मीपूजन आणि ईद-ए-मिलाद या तीनच सुट्ट्या रविवारी येत आहेत. तर उर्वरीत २१ सुट्ट्या या इतर वारी येत असल्यामुळं नवीन वर्षात सुट्ट्यांची चंगळ आहे. वसुबारस आणि धनत्रयोदशी ही एकाच दिवशी २५ ऑक्टोबरला आहे. २७ ऑक्टोबरला नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन तर २८ ऑक्टोबरला पाडवा आणि २९ ऑक्टोबरला भाऊबीज येत असल्यानं दिवाळी ४ दिवसच असल्याचं सोमण यांनी सांगितलं. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर वगळता इतर ९ महिने विवाह मुहुर्ताचे आहेत. नवीन वर्षी ६ जून, ४ जुलै आणि १ ऑगस्ट असे तीन गुरूपुष्य योग आले आहेत. पण अंगारकी चतुर्थी मात्र १७ सप्टेंबरला एकच आली असल्याची माहिती दा. कृ. सोमण यांनी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading