ठाण्यातील ५ क्लस्टर क्षेत्रांच्या बायोमेट्रीक सर्वेची पुढील वर्षापासून सुरूवात.

ठाणे महापालिका क्षेत्रातील कोपरी, हजुरी, राबोडी, किसननगर आणि लोकमान्यनगर या क्षेत्राच्या क्लस्टरचे बायोमेट्रीक सर्वेक्षण १ जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले असून ३० जानेवारीपर्यंत लाभार्थ्यांची अंतिम पात्रता यादी प्रसिध्द केली जाणार आहे. क्लस्टरच्या कामाला गती मिळावी तसंच क्लस्टरसंबंधी प्राप्त होणा-या तक्रारींचा तातडीनं निपटारा करण्यासाठी ५ कक्ष स्थापन करण्याचा निर्णयही महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. कोपरी, हजुरी, राबोडी, किसननगर आणि लोकमान्यनगर या क्षेत्रांच्या नागरी पुनरूथ्थान आराखड्यांना मंजुरी मिळाली असून या योजनेतील लाभार्थ्यांची पात्रता यादी निश्चित करण्यासाठी सहाय्यक आयुक्तांच्या स्तरावर १ जानेवारीपासून १५ जानेवारीपर्यंत बायोमेट्रीक सर्वेक्षण केलं जाणार आहे. १५ ते २२ जानेवारीच्या दरम्यान या विषयीच्या हरकती स्वीकारल्या जाणार असून २३ ते २८ जानेवारीपर्यंत उपायुक्तांच्या स्तरावर त्यांची सुनावणी होणार आहे. सुनावणीनंतर ३० जानेवारीपर्यंत अंतिम पात्रता यादी प्रसिध्द होणार आहे. पात्रता आणि लाभार्थ्यांच्या अनुज्ञेय क्षेत्राविषयी निर्णय घेण्याबाबत परिमंडळ उपायुक्तांच्या स्तरावर एका कक्षाची निर्मिती केली जाणार आहे. या योजनेच्या अनुषंगानं शाळा, हॉस्पीटल, उद्यानं अशा सुविधा निर्माण करण्यासाठी निर्णय घेण्याकरिता नगर अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र कक्ष स्थापन केला जाणार आहे. या योजनेच्या अनुषंगानं छाननी, सल्ला कक्ष तसंच कायदेविषयक बाबींसाठी विशेष कक्ष स्थापन केला जाणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading