चिपळूणमधील डेरवण युथ गेम 2021 जलतरण स्पर्धेत ठाण्यातील स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या जलतरणपटूंची दमदार कामगिरी

चिपळूणमधील डेरवण येथे झालेल्या डेरवण युथ गेम 2021 या जलतरण स्पर्धेत ठाण्यातील स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या जलतरणपटूंनी दमदार कामगिरी करीत सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदके प्राप्त करीत पुन्हा एकदा ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. 13 सुवर्णपदकांसह, 19 रौप्य व 4 कांस्यपदके स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशच्या जलतरपटूंनी पटकाविली.
डेरवण येथे 27- 28 मार्चला या स्पर्धा पार पडल्या. ब्रेकस्ट्रोक, बॅकस्ट्रोक, फ्रीस्टाईल, बटरफ्लाय या विविध क्रीडाप्रकारात जलतरणपटूंनी पारितोषिके पटकाविली. या स्पर्धेत 8 वर्षाखालील गटात मुलींमध्ये फ्रेया शहा हिने 2 सुवर्ण आणि 2 रौप्यपदके प्राप्त केली. श्रुती जांभळे हिने 1 रौप्यपदक प्राप्त केले तर याच गटात मुलांमध्ये रुद्र निसार याने 2रौप्यपदकासह 1 कांस्यपदक प्राप्त केले. कोविड 19 चा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून गेले वर्षभर तरणतलाव बंद होते. जवळ जवळ 10 महिन्यानंतर तरणतलाव सुरू झाल्यानंतर ठाणे महापालिकेच्या मारोतराव शिंदे तरण तलाव येथे जलतरणपटूंनी सरावास सुरूवात केली. अत्यंत कमी कालावधीत सराव करुन जलतरणपटूंनी केलेल्या चमकदार कामगिरीबाबत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 10 वर्षाखालील गटात मुलींमध्ये आयुषी आखाडे हिने 3 सुवर्णपदकांसह 4 रौप्यपदके पटकाविली. याच गटात मुलांमध्ये विहान चतुर्वेदी याने 5 सुवर्णपदकांसह 3 रौप्य तर विराट ठक्कर यांनी 2 रौप्यपदकासह 1 कांस्यपदक पटकाविले. 12 वर्षाखालील गटात मुलांमध्ये इदांत चतुर्वेदी याने 3 सुवर्णपदकांसह 1 कांस्यपदक तर आदित्य घाग याने 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्यपदक पटकाविले. 16 वर्षाखालील गटात मानव मोरे यांनी 1 कांस्यपदक प्राप्त केले. तर ओजस मोरे, माही जांभळे, नक्ष निसार या 5 वर्षाखालील गटातील जलतरणपटूंनी 8 वर्षाखालील गटात सहभागी होत स्पर्धा पूर्ण करीत चांगली कामगिरी केली.

Leave a Comment

%d bloggers like this: