ठाणे महापालिका क्षेत्रातही घरोघरी जाऊन कोविड लसीकरण करण्याची आमदार निरंजन डावखरेंची मागणी

मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ठाणे महापालिका क्षेत्रातही घरोघरी जाऊन कोविड लसीकरण करण्याबाबत नियोजन करावे, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. ठाण्याची लोकसंख्या २५ लाखांपर्यंत असताना आतापर्यंत केवळ सव्वा लाख नागरिकांचे लसीकरण झाले असल्याने लसीकरण मोहिमेला वेग देण्याची आवश्यकता असल्याचे डावखरे यांनी म्हटले आहे. महापालिका क्षेत्रात कोविड संसर्गात दिवसेंदिवस वाढ होत असून, दररोज सुमारे १ हजार रुग्ण आढळत आहेत. दररोज रुग्णवाढीचे नवे उच्चांक प्रस्थापित होत आहेत. या परिस्थितीत कोविड लसीकरणाचा वेग वाढविण्याची आवश्यकता आहे. महापालिका क्षेत्राची लोकसंख्या सुमारे २५ लाखांपर्यंत पोचली आहे. तर महापालिका क्षेत्रात २५ मार्चपर्यंत केवळ १ लाख २४ हजार ८२७ नागरिकांचे कोविड लसीकरण पूर्ण झाले होते. त्यात सुमारे ५५ हजार ११८ फ्रंटलाईन वर्कर्सचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर घरोघरी लसीकरण मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे, असे आमदार डावखरे यांनी पत्रात म्हटले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. त्यातील बहूसंख्य नागरिक लसीकरणासाठी घराबाहेर पडले नाहीत, ही वस्तूस्थिती आहे. मुंबई महापालिकेने घराबाहेर न पडलेल्या नागरिकांसाठी घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार नियोजन करण्यात येत आहे. त्याचधर्तीवर ठाणे महापालिका क्षेत्रातही महापालिकेने घरोघरी लसीकरण करण्याचा गांभीर्याने विचार करावा. तसेच त्याबाबत लवकरात लवकर नियोजन करावे, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading