अवघ्या काही मिनिटात ४६७ कोटींची ३१५ प्रकरणं मंजूर करण्याचा सर्वसाधारण सभेत पराक्रम

ठाणे महापालिकेच्या फेब्रुवारी मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत ४६७ कोटींची कामं आयत्या वेळेला मंजूर करण्यात आली असून याला भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी आक्षेप घेतला असून मुख्यमंत्र्यांकडे चौकशीच्या मागणी बरोबरच न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत काल फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त मंजुरीला आले होते. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत आयत्या वेळचा विषय म्हणून ३१५ प्रकरणं मंजूर करण्यात आली आहेत. त्याची एकत्रित किंमत ४६७ कोटी आहे. आपत्कालीन किंवा अतिमहत्वाचा विषय आयत्यावेळचा विषय म्हणून मांडला जातो. मात्र सत्ताधारी शिवसेना, विरोधी पक्ष आणि प्रशासनाशी हातमिळवणी करत अवघ्या काही मिनिटात ही प्रकरणं मंजूर करण्यात आली. यावर ना कोणती चर्चा झाली अथवा विषय पत्रिकेवर विषय न आणताच मंजुरी घेण्यात आली. यामागे नक्की काहीतरी गौडबंगाल असून फेब्रुवारी महिन्याचे इतिवृत्तांत ७ महिन्यांनी मंजुरीला का आले जाते याबाबत नगरसेवक कृष्णा पाटील यांनी हरकत नोंदवली आहे. नियमाप्रमाणे एका सर्वसाधारण सभेचं इतिवृत्त पुढच्या सर्वसाधारण सभेत सादर करणं बंधनकारक आहे. असं असताना हा प्रकार म्हणजे सत्ताधारी, प्रशासन आणि विरोधी पक्ष यांची भ्रष्ट युती असल्याचा आरोप कृष्णा पाटील यांनी केला आहे. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असून वेळप्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशाराही कृष्णा पाटील यांनी दिला आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading