राफेल विमान गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी यांचा निषेध

राफेल विमान गैरव्यवहार प्रकरणी निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे खेळण्यातील तसेच कागदी विमानं उडवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी यांचा निषेध करण्यात आला. राफेल विमान खरेदीसाठीच्या व्यवहारामध्ये अनिल अंबानी यांना भागीदार करून घेण्याकरिता भारतानं दबाव टाकला होता अशी कबुली फ्रान्सच्या माजी अध्यक्षांनी दिली आहे. त्यामुळेच मोदी सरकारनं उद्योगपती अनिल अंबानी यांना फायदा पोहचवण्यासाठी हिंदुस्थान एरोनॉटिकल कंपनीला बाहेर काढल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. यावेळी कार्यकर्त्यांनी देश का चौकीदार चोर है, राफेल डील रद्द झालेच पाहिजे अशा घोषणा देत सरकारचा निषेध केला. तसंच डोरेमॉन या कार्टूनला मोदींचं चित्र लावून कागदी विमानं उडवण्यात आली. हा व्यवहार देशाच्या सुरक्षिततेशी संबंधित असून सीमेवर लढणा-या जवानांच्या रक्ताचा केलेला हा सौदा आहे असा आरोपही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला. राफेल घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी करण्यात यावी, राफेल विमानाचे वाढलेले दर, कमी केलेली संख्या, या व्यवहारातील कराराची संपूर्ण सत्यता, एचएएलला बाजूला सारून रिलायन्सला कंत्राट देण्यासाठी केलेला आग्रह यावर पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावं अशी मागणीही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading