NCPpoliticalTMC

मुंब्रा आणि शिळ-दिव्यातील प्रलंबित विकासकामे मार्गी लागणार

कळवा, मुंब्रा आणि दिवा या ठिकाणी ठेकेदारांनी कामे प्रलंबित ठेवल्यामुळे त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. अशा ठेकेदार, अधिकार्‍यांची बैठक बोलावून त्यांना समज देण्यात येईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी दिल्याची माहिती विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी दिली. नगरसेवक निधीअभावी अनेक विकास कामे रखडली आहेत. अर्थसंकल्पाची व्यवस्थीत अमलबजावणी केली जात नाही. आदी विषयांच्या संदर्भात पठाण यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी शानू पठाण यांनी, सध्या युटीडब्ल्यूटीचे काम सह्याद्री, मल:निस्सारणाचे काम के. ई इन्फ्रा; वॉटर रिमॉल्डींगचे काम शयानो; अंडरग्राउंड केबल टाकण्याचे काम सागर साई या ठेकेदारांकडून सुरु आहे. मात्र, नेहमीप्रमाणे या ठेकेदारांनी कामे अर्धवट ठेवली आहेत. या संदर्भात विचारणा केल्यास ते अश्लाघ्य भाषेत बोलत आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी; नगरसेवक निधी नगरसेवकांना देऊन त्यांच्या प्रभागातील विकासकामांना सुरुवात करावी; नगरसेवकांच्या समस्या महासभेत ऐकून घ्याव्यात; कौसा येथील रुग्णालय तत्काळ सुरु करावे, शिळ- दिवा दरम्यानच्या रस्त्याचे बांधकाम आणि दिवा येथील नाल्याचे बांधकाम तत्काळ करावे, आदी मागण्या आयुक्तांसमोर मांडल्या. आयुक्तांनीही हे सर्व विषय गांभीर्याने घेतले असून या संदर्भात लवकरच ठेकेदारांना बोलावून त्यांना समज देण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच प्रलंबित कामे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांच्या देखरेखीखाली पूर्णत्वास नेण्यात येतील असे आश्वासन दिले.

 

Comment here