festival

छठ पूजेचा उत्सव कोरोनाच्या छायेखालीच – नियम धाब्यावर बसवत छठ पूजा

उत्तर प्रदेश आणि विशेषत: बिहारमध्ये मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणारा छठ पूजेचा उत्सव ठाण्यातील बिहारी बांधवांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावपूर्ण वातावरणात साजरा केला. मात हा उत्सव कोरोनाच्या छायेखालीच साजरा झाला. यंदा या उत्सवावर अनेक निर्बंध लावण्यात आले होते. सामुदायिक छठ पूजा करण्यास बंदी होती त्याचप्रमाणे कोरोनाबाबत असलेले नियम पाळण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. पण अनेक ठिकाणी हे सर्व नियम धाब्यावर बसवत छठ पूजा करण्यात आली. ठाणे महापालिकेतर्फे छठ पूजेसाठी कृत्रिम तलाव सदृश्य वातावरण निर्मिती करण्यात आली होती. या ठिकाणीच ही पूजा करण्यात आली. छठ पूजा हा सूर्याच्या पूजेचा एक प्रकार समजला जातो. जी व्यक्ती एकाग्रचित्त होऊन हे व्रत करते, तिला दु:ख, दारिद्र्य आणि विविध आजारांपासून मुक्ती मिळते अशी यामागची भावना आहे. छठ हा शब्द सूर्यषष्ठी या शब्दाचा अपभ्रंश आहे. वर्षातून दोन वेळा कार्तिक आणि चैत्र महिन्यात ही षष्ठी येते. परंतु कार्तिक महिन्यात येणा-या षष्ठीला या पूजेसाठी अनन्यसाधारण महत्व आहे. कार्तिक महिन्यात येणा-या चतुर्थीपासून या पूजेच्या अनुष्ठानांना प्रारंभ होतो. दिवाळीचा सण समाप्त झाल्यानंतर सहाव्या दिवशी छठपर्व म्हणून हा उत्सव साजरा होतो. हा जरी सण असला तरी सणाचं अवडंबर यामध्ये नाही. या दिवशी देवाची प्रार्थना केली जाते. ही पूजा करणा-या भाविकांना एक दिवस आणि रात्र निर्जल उपवास करावा लागतो. दिवसाच्या चौथ्या प्रहरात म्हणजे सूर्यास्ता दरम्यान तलावात किंवा वाहत्या पाण्यात उभं राहून सूर्यदेवाला अर्घ्य प्रदान केलं जातं. तर सूर्योदय होण्याआधी पहाटे लवकर उठून पुन्हा याच प्रकारे अर्घ्य प्रदान केलं जातं. त्यानंतर पूजेचा प्रसाद खाऊन या उपवासाची समाप्ती करण्यात येते. विशेष म्हणजे या पूजेसाठी कोणत्याही ब्राह्मण अथवा पुरोहिताची गरज भासत नाही. सूर्य षष्ठीव्रत कथेमध्ये पुराणातील २७ श्लोकांचा समावेश आहे. नारद आणि सूर्यनारायणाच्या प्रश्नोत्तरांच्या रूपानं व्रताची महती कथित करण्यात आली आहे. ठाण्यातील उपवन, रायलादेवी तसंच मासुंदा तलाव परिसरात निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावात छठ पूजेसाठी गर्दी झाली होती. छठ पूजेसाठी महापालिकेतर्फे शहरातील विविध तलावांवर सर्व व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी महापालिका आयुक्तांनी भेट देऊन मास्कचा वापर आणि शारिरीक अंतराचं पालन होत आहे की नाही याचा आढावा घेतला.

Comment here