९ वर्षाच्या प्रयत्नानंतर सुरू झालेल्या मेट्रोस विरोध न करण्याचं आमदार प्रताप सरनाईक यांचं आवाहन

नऊ वर्षाच्या प्रयत्नानंतर सुरू झालेल्या कासारवडवली ते वडाळा मेट्रो ४ च्या कामामध्ये विघ्न आणू नये असं आवाहन आमदार प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. ठाणे मतदाता जागरण अभियानानं अलिकडेच एक पत्रकार परिषद घेऊन ठाण्यातील मेट्रो उन्नत ऐवजी भूमिगत असावी अशी मागणी केली होती आणि यासंदर्भात न्यायालयात याचिकाही दाखल करणार असल्याचं म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर आमदार प्रताप सरनाईक यांनी हे आवाहन केलं आहे. शहरामध्ये मेट्रो आणण्यासाठी आपण नऊ वर्ष प्रयत्न केले. विधीमंडळ आणि विधीमंडळाबाहेर आंदोलनं केली. त्याचा काही उपयोग झाला नाही. मात्र युती सरकारच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घेत कासारवडवली ते वडाळा या मेट्रोबरोबरच कासारवडवली ते गायमुख आणि गायमुख ते भाईंदर या मेट्रो मार्गालाही मंजुरी दिली आहे. आता या कामाला सुरूवात झाली असून यामधील अडथळ्यांवरही मात करण्यात आली आहे. पुढील तीन वर्षाच्या आत कासारवडवली ते वडाळा मेट्रो सुरू होईल. मेट्रोच्या सुरूवातीला मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय सेठी यांनी ४० हजार कोटी रूपयांचा भूमिगत मेट्रोसाठी येणा-या खर्चाचा प्रकल्प अहवाल केंद्र आणि राज्याकडे मंजुरीसाठी पाठवला होता. पण एवढा खर्च परवडणारा नसल्यामुळं दिल्लीच्या धर्तीवर मुंबई आणि ठाण्यात उन्नत मार्गानेच मेट्रो उभारण्याचं सांगण्यात आलं. अत्यावश्यक आणि मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती असलेल्या ठिकाणीच भूमीगत मेट्रो उभारण्याचा निर्णय केंद्र आणि राज्यानं घेतला आहे. मेट्रो ४ साठी १४ हजार कोटी रूपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. यापूर्वी मेट्रो प्रकल्प उन्नत नसावा भूमिगत असावा अशी मागणी करण्यात आली नव्हती. त्यामुळं काही काम चुकीचं होत असेल तर चर्चेनेही मार्ग निघू शकतो. काही मान्यवरांनी जर सल्ला दिला तर पुढे तसं कामही होऊ शकतं. परंतु विकासाला विरोध करू नये असं आवाहन आमदार प्रताप सरनाईक यांनी केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading