शहापूर तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांना,घाटाजवळील खोऱ्यात अमृतकूंभ जलसागर धरण उभारावे – आमदार निरंजन डावखरे

शहापूर तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी कसारा घाटाजवळील खोऱ्यात अमृतकूंभ जलसागर धरण उभारावे, अशी आग्रही मागणी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे केली आहे. एकीकडे मुंबई-ठाण्याला पाणीपुरवठा करणारी धरणे असतानाच, शहापूरच्या एका भागातील सुमारे २०० गाव-पाड्यातील ग्रामस्थ पाणीपुरवठ्यासाठी वणवण भटकत असल्याचे चित्र आहे. विशेषतः दिवसेंदिवस विंधण विहीरीतील पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे ग्रामस्थांच्या हालात भर पडते. आमदार डावखरे यांनी पाणीटंचाईग्रस्त भागातील काही गावांना भेट दिली. त्यावेळी टंचाईवरील तत्काळ उपाययोजनांबरोबर भविष्यातील नियोजनावर ग्रामस्थांबरोबर चर्चा केली. त्यावेळी खर्डी विभाग कुणबी समाजोन्नती संघाचे पदाधिकारी त्र्यंबक डोंगरे, प्रकाश सांडे आणि भरत पांढरे यांनी अमृतकुंभ जलसागर धरणाच्या प्रस्तावाकडे लक्ष वेधले होते. शहापूर तालुक्याच्या उत्तरेकडील घाटनदेवी माता मंदिराच्या दक्षिण बाजूला आणि कसारा घाट रस्त्याच्या डावीकडील खोऱ्यांमधील पाच ते सात दऱ्यांच्या परिसरात धरण उभारता येईल. प्रस्तावित धरणाचा परिसर शहापूर तालुक्याच्या २०० ते ५०० मीटर उंच भूभागावर असल्यामुळे गुरुत्वाकर्षण पद्धतीने गावांना सहजपणे पाणीपुरवठा होईल. प्रस्तावित धरणाच्या क्षेत्रातील जमीन वन विभागाच्या मालकीची असून, धरणाच्या परिसरात एकही गाव वसलेले नाही. त्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होणार नाही. या पार्श्वभूमीवर प्रस्तावित अमृतकुंभ जलसागर धरणाचा आराखडा लवकरात लवकर तयार करावा, अशी मागणी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्याकडे आमदार डावखरे यांनी केली आहे.शहापूर तालुक्यातील साखरोली आणि मुरबाड तालुक्यातील मानिवली येथील धरणामध्ये गाळ साचला असुन गाळ काढण्याबरोबरच दोन्ही तलावांचे खोलीकरण आणि रुंदीकरण केल्यास परिसराला चांगला पाणीसाठा होण्याबरोबरच विहिरी तसेच विंधण विहीरींच्या पाणीपातळीतही वाढ होऊ शकेल. या पार्श्वभूमीवर दोन्ही धरणातील गाळ काढण्याबरोबरच खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यासाठी आमदार डावखरे यांनी पाठपुरावा सुरू केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading