विवियाना मॉलमध्ये सिध्दीविनायकाचं मंदिर उडवून देण्याची खोडसाळ धमकी देणा-या व्यक्तीस अटक

विवियाना मॉलमधील बाथरूममध्ये दहशतवादी पोस्टर लिहिणा-या व्यक्तीस वर्तकनगर पोलीसांनी अटक केली आहे. आज एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. विवियाना मॉलमधील तळ आणि पहिल्या मजल्यावरील पुरूषांच्या स्वच्छतागृहामध्ये दादर येथील सिध्दीविनायक मंदिर उडवून देण्याची धमकी देणारा कागद चिकटवण्यात आला होता. ईसिस इज कमिंग, स्लीपर सेल इज ॲक्टीव्हेटेड असं या कागदावर लिहिण्यात आलं होतं. त्यावर दोन मोबाईल नंबर टाकण्यात आले होते. हा कागद मिळाल्यावर विवियाना आणि आजूबाजूच्या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. विवियाना मॉल आणि आजूबाजूच्या परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला होता. पोलीसांनी या कागदावरील दोन्ही नंबरवर संपर्क साधून चौकशी केली. त्यावेळी दोन्ही व्यक्ती एकाच कंपनीत कामाला असल्याचं निष्पन्न झालं. मुलीकडे अधिक चौकशी करता तिचा पूर्वीचा मित्र केतन घोडके याच्याशी असणारे ७ वर्षाचे संबंध तोडल्यामुळे त्यांच्यात वाद झाले होते. त्यामुळं तिनं हा संदेश केतन घोडकेनं लिहिला असावा असा संशय व्यक्त केला होता. त्याप्रमाणे पोलीसांनी विक्रोळीत तपास करून केतन घोडके याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्यानं पूर्वीच्या मैत्रिणीला आणि तिच्या मित्राला त्रास देण्याच्या उद्देशानं हे केल्याची कबुली पोलीसांना दिली. हा प्रकार म्हणजे खोडसाळपणा असून दहशतवादी किंवा इतर कोणताही संशयास्पद प्रकार नसल्याचं पोलीसांनी सांगितलं. अवघ्या ४ तासात पोलीसांनी आरोपीला अटक केले अशी माहिती एका पत्रकार परिषदेत देण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading