वाघबीळ ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार – पोलिंग बूथही लावू न देण्याचा इशारा

वाघबीळ गावच्या ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं ठरवलं असून गावामध्ये प्रचार फेरी नाही तर पोलिंग बूथही लावू न देण्याचा इशारा दिला आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार भूमीपुत्रांवर आलेल्या संकटाच्या वेळी ५ वर्ष गावात फिरकले नाहीत. यामुळेच ग्रामस्थांनी एकमतानं मतदानावर बहिष्कार घालण्याचं ठरवलं आहे. भूमिपुत्रांच्या गावांवर क्लस्टर योजना, वॉटर डिसेलिनेशनचे आरक्षण, वॉटर फ्रंट प्रकल्प, मेट्रो कारशेडचे आरक्षण, मेट्रो कास्टींग यार्डचे आरक्षण, कांदळवनाची शेतीमध्ये लागवड, जबरदस्तीने होणारे अधिग्रहण, मोबदला न देता सुरू असलेले अधिग्रहण, भूमिपुत्रांच्या घरांवर कारवाई अशाप्रकारची अनेक संकटं आली असताना लोकप्रतिनिधी म्हणून विद्यमान खासदारांनी लोकांच्या भावना जाणून घेण्यासाठी भूमिपुत्रांशी संवाद साधणं अपेक्षित होतं. पण दुर्दैवानं तसं झालं नाही. त्याचप्रमाणे नवी मुंबईतील ग्रामस्थ अनेक वर्ष प्रॉपर्टी कार्ड मिळावं म्हणून लढा देत आहेत पण म्हणावा तसा प्रतिसाद लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून मिळत नाही. नवी मुंबईतील जमिनी १९७०च्या आसपास अधिग्रहीत केल्या गेल्या. त्यानंतर भूमिपुत्र आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी झगडत आहेत. लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकून त्यांच्यासोबत असल्याचा संदेश देत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. ठाण्याचा विकास होत असल्याचं चित्र दिसत असलं तरी गावांना संपवण्याचा विडा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी उचलला आहे. वाघबीळ गावामधून प्रचार फेरी नव्हे तर पोलिंग बूथसुध्दा लावू दिला जाणार नाही अशी भूमिका वाघबीळच्या गावक-यांनी घेतली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading