वज्रेश्वरी मंदिरातील चोरी उघडकीस – चोरट्यांसह ७ लाखाहून अधिक रक्कम हस्तगत

जिल्ह्यातील वज्रेश्वरी देवी मंदिरातील दानपेट्या चोरणा-या ५ दरोडेखोरांना ठाणे ग्रामीण पोलीसांनी अटक केली असून तीन जण फरार आहेत. एका पत्रकार परिषदेत ठाणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक शिवाजी राठोड यांनी ही माहिती दिली. १० मे रोजी या मंदिरात चोरट्यांनी चोरी केली होती. ठाणे ग्रामीण पोलीसांनी गोविंद गिभल, विनित चिमडा, भारत वाघ, जगदिश नवतरे, प्रवीण नवतरे अशा ५ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून ७ लाख १० हजारांची रोकडही हस्तगत केली आहे. मंदिराच्या मागे असलेल्या जंगलाचा फायदा घेत आलेल्या या चोरट्यांनी सुरक्षा रक्षकांना जबर मारहाण करत मंदिरातील दानपेट्यांची लूट केली होती. दानपेट्या फोडून त्यातील रक्कम गोण्यांमध्ये भरून हे सर्वजण पळून गेले होते. त्यानंतर दरोड्यामध्ये मिळालेल्या पैशाची वाटणी करून हे सर्वजण दादरा नगर हवेली आणि जव्हारमध्ये पळून गेले होते. वज्रेश्वरी मंदिरात दरोडा पडल्यामुळं मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळं पोलीसही अडचणीत आले होते. मात्र पोलीसांनी त्वरीत तपास करत यापैकी ५ जणांना अटक केली असून यातील ३ आरोपी फरार असल्याचं पोलीस अधिक्षक शिवाजी राठोड यांनी सांगितलं. या चोरीतील आणखी काही रक्कम हाती येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading