यावर्षी सरासरीपेक्षा थोडा कमी पाऊस – पंचांगांचाही अंदाज

विविध वेधशाळांनी यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला असतानाच पंचांगांमधूनही यावर्षी सरासरीपेक्षा थोडा कमी पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ही माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. पंचांगांमध्ये पर्जन्य नक्षत्र आणि त्यांची वाहनंही दिलेली असतात. ८ ते २१ जून मृग नक्षत्र असून वाहन उंदीर आहे. २२ जून ते ५ जुलै आर्द्रा नक्षत्र असून वाहन हत्ती आहे. ६ जुलै ते १९ जुलै पुनर्वसु नक्षत्र असून वाहन मेंढा आहे. २० जुलै ते २ ऑगस्ट पुष्य नक्षत्र असून वाहन गाढव आहे. ३ ते १६ ऑगस्ट आश्लेषा नक्षत्र असून वाहन बेडूक आहे. १७ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट मघा नक्षत्र असून वाहन उंदीर आहे. ३१ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर पूर्वा फाल्गुनी नक्षत्र असून वाहन घोडा आहे. १३ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर उत्तरा फाल्गुनी नक्षत्र असून वाहन मोर आहे. २७ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर हस्त नक्षत्र असून वाहन गाढव आहे. ११ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर चित्रा नक्षत्र असून वाहन बेडूक आहे. २४ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर स्वाती नक्षत्र असून वाहन उंदीर आहे. बेडूक, म्हैस आणि हत्ती वाहन असताना खूप पाऊस पडतो. मोर, गाढव, उंदीर वाहन असताना अनियमित आणि कमी पाऊस पडतो. कोल्हा आणि मेंढा वाहन असताना अल्प पाऊस पडतो तर घोडा वाहन असताना पर्वतावर पाऊस पडतो असं सांगितलं जातं. पंचांगातील पावसाचे अंदाज हे केवळ ठोकताळे असतात ते कधी चुकतात तर कधी बरोबर येतात. अर्थात हे अंदाज वेधशाळेच्या अंदाजांप्रमाणे वैज्ञानिक निकषावर नसतात असंही दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading