महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नसल्यामुळं विजयी उमेदवारांच्या मताधिक्क्यात वाढ

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी न झाल्याचा फायदा विजयी उमेदवारांच्या मताधिक्क्यात झाल्याचं दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं यंदा आपला उमेदवार उभा केला नव्हता. त्यामुळं साधारणपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची लाखभर मतं शिवसेनेकडे वळल्याचं दिसत आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात २००९ मध्ये राजन राजे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार होते. तेव्हा त्यांना १ लाख ३४ हजार ८४० मतं मिळाली होती. तर २०१४ मध्ये अभिजित पानसे यांना ४८ हजार ८६३ मतं मिळाली होती. भिवंडीमध्ये २०१४ मध्ये सुरेश म्हात्रे यांनी निवडणूक लढवली होती. तर २००९ मध्ये देवराज म्हात्रे यांनी निवडणूक लढवताना १ लाख ७ हजार ९० मतं मिळवली होती. कल्याण लोकसभा मतदारसंघात २००९च्या निवडणुकीत वैशाली दरेकर यांनी १ लाख २ हजार ६३ तर २०१४ ला रतनबुवा पाटील यांनी १ लाख २२ हजार ३४९ मतं मिळवली होती. त्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही मतं आणि मतदारसंघात झालेल्या मतदारांच्या वाढीचा फायदा विजयी मतदारांच्या मताधिक्क्यात झाल्याचं दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध ठिकाणी घेतलेल्या सभेत शिवसेना-भारतीय जनता पक्षाला मतं न देण्याचं आवाहन केलं होतं. प्रत्यक्षात मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मतं जिल्ह्यात तरी शिवसेनेच्याच पारड्यात गेल्याचंच दिसत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading