भिवंडी लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांना काँग्रेसच्याच नगरसेवकांचा विरोध

भिवंडी लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांना भिवंडी महापालिकेच्या काँग्रेसच्याच नगरसेवकांनी विरोध दर्शवला आहे. आज एका पत्रकार परिषदेत या नगरसेवकांनी टावरे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवून दुसरा कोणीही उमेदवार देण्याची मागणी केली आहे. या पत्रकार परिषदेला भिवंडी महापालिकेतील काँग्रेसच्या ३५ नगरसेवकांनी उपस्थिती दर्शवून सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला. तर पालिकेतील ४२ हून अधिक नगरसेवकांचा सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला विरोध असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार सुरेश टावरे यांनी गेल्यावेळी असलेले काँग्रेस उमेदवार विश्वनाथ पाटील यांच्याविरोधात काम केलं. पक्ष संघटनेशी काहीही संबंध ठेवला नाही. कार्यकर्त्यांवर झालेल्या अन्यायाच्या वेळी त्यांना कधीही मदत केली नाही. असे काही आक्षेप सुरेश टावरे यांच्यावर या नगरसेवकांनी घेतले आहेत. काँग्रेस टावरे यांना उमेदवारी देऊन एकप्रकारे ही जागा भारतीय जनता पक्षाला स्वत:हून देत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. काँग्रेसमधील कोणीही नेता याबाबत ऐकून घेत नसल्यामुळं ही पत्रकार परिषद घेत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी टावरे यांच्या उमेदवारीचा फेरविचार करावा, इतर कोणालाही उमेदवारी द्यावी पण टावरे यांना देऊ नये अशी मागणी या नगरसेवकांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading