भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना पालघर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी

भारतीय जनता पक्षाचे पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांना शिवसेनेनं पालघरमधून अखेर उमेदवारी जाहीर केली आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना पालघरमधून कोणाचीच उमेदवारी जाहीर करण्यात आली नव्हती. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोघांच्या उमेदवारी यादीमध्ये पालघरची उमेदवारी जाहीर झाली नव्हती. त्यामुळं या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी दिली जाणार याबाबत उत्सुकता होती. मात्र भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना शिवसेनेनं उमेदवारी जाहीर केली आहे. एका पत्रकार परिषदेत उध्दव ठाकरे यांनी राजेंद्र गावित यांची उमेदवारी जाहीर केली. गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे. चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर पालघर लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षानं शिवसेनेचा पराभव करत हा मतदारसंघ आपल्याकडे राखला होता. चिंतामण वनगांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांनी शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली होती. मात्र प्रतिष्ठेच्या लढाईत भारतीय जनता पक्षानं या मतदारसंघात विजय मिळवला. त्याचवेळी शिवसेनेनं हा मतदारसंघ आपल्याकडेच असेल अशी घोषणा केली होती. लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षानं शिवसेनेशी केलेल्या युतीदरम्यान हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडला होता. आता राजेंद्र गावित हे या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार राहणार आहेत. तर श्रीनिवास वनगा यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याचं आश्वासन देण्यात आल्याचं सांगितलं जातं. वनगा यांनी मात्र आपण स्वत:हून या निवडणुकीतून माघार घेतल्याचं म्हटलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading