भारतातील पहिल्या मोबाईल मॅमोग्राफी व्हॅनचं महापौरांच्या हस्ते लोकार्पण

बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये झपाट्यानं वाढणा-या स्तनांच्या आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी प्राथमिक स्तरावर कर्करोगाचं निदान करण्याकरिता तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक मोबाईल मॅमोग्राफी व्हॅनचं लोकार्पण आज करण्यात आलं. महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या हस्ते हे लोकार्पण करण्यात आलं. भारतातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे. जीवनशैलीत होणारे बदल, उशीरा मूल होणं, स्तनपानाचा अभाव, स्तनाच्या कर्करोगाच्या प्राथमिक लक्षणांची अपुरी माहिती, वैद्यकीय चाचण्यांबाबतच्या जागृतीचा अभाव तसंच तपासणीसाठी आवश्यक सोयीसुविधांची वानवा यामुळं शहरातील महिलांना कर्करोगाची योग्य तपासणी करणं शक्य होत नव्हतं. यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीनं महिलांना कर्करोगाची तपासणी तात्काळ करून योग्य उपचार घेता यावेत याकरिता ही मोबाईल मॅमोग्राफी व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे. कर्करोग प्राथमिक अवस्थेत ओळखता आला तर पूर्ण बरा होऊ शकतो. लवकर निदान झाल्यास साध्या उपचारानेही तो बरा करता येतो म्हणून सर्व विवाहित स्त्रियांनी महापालिकेच्या या मोबाईल व्हॅनमधील अद्ययावत यंत्रणेद्वारे तपासणी करून घेण्याचं आवाहन महापौर आणि महापालिका आयुक्तांनी केलं आहे. महापालिकेच्या प्रत्येक प्रभाग समितीमध्ये या मोबाईल व्हॅनद्वारे तपासणी करता येणार आहे. या व्हॅनमध्ये होणारी तपासणी मोफत असून या तपासणीचा प्रत्येक गृहसंकुलातील महिलांना लाभ घेता येणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading