परिवहन सेवेच्या कर्मचा-यांना त्यांची थकबाकी लवकरच मिळण्याची शक्यता

पोलीसांनी दिलेल्या थकबाकी पोटीच्या रक्कमेतून परिवहन सेवेच्या कर्मचा-यांना त्यांची थकीत देणी मिळण्याची शक्यता आहे. गेल्या १० वर्षापासून पोलीसांनी परिवहन सेवेच्या बसमधून मोफत प्रवासासाठी थकवलेली २३ कोटींची रक्कम महापालिकेला दिली आहे. या रक्कमेचा विनियोग परिवहन सेवेच्या कर्मचा-यांची थकबाकी देण्यासाठी करावा अशी मागणी यापूर्वी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी पालिका आयुक्तांकडे केली होती. त्याचा पाठपुरावा परिवहन कामगार संघटनेनं केल्यानं साडेपंधरा कोटींची रक्कम थकबाकी पोटी मिळणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष गणेश देशमुख यांनी दिली. महापालिकांच्या परिवहन सेवांच्या बसमधून कर्तव्यासाठी जाणा-या पोलीसांना मोफत प्रवास करता येतो. वर्षभरात १ हजाराहून जास्त पोलीस परिवहन सेवेच्या बसमधून प्रवास करतात. या प्रवास भाड्याची रक्कम २००७-२००८ पासून परिवहन सेवेला मिळाली नव्हती. परिवहन सेवा आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेली असताना पोलीसांनी थकवलेली ही रक्कम मिळावी यासाठी पालिकेच्या वतीनं ब-याचदा प्रयत्न करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी अनपेक्षितपणे ही रक्कम पोलीसांकडून परिवहन सेवेला देण्यात आली. परिवहन सेवा कर्मचा-यांचे विविध भत्ते आणि अनुदानापोटी ३० कोटींची देणी प्रलंबित आहेत. परिवहन सेवा अडचणीत असताना कर्मचा-यांनी तिला सावरण्याचं काम केलं आहे. सेवानिवृत्तीनंतरही अनेक कर्मचा-यांना त्यांच्या हक्काची देणी मिळू शकलेली नाहीत. त्यामुळं ही रक्कम दिल्यास कर्मचा-यांचं मनोबळ वाढेल आणि काम करण्यासाठी ते प्रोत्साहित होतील या हेतूनं या रक्कमेतून कर्मचा-यांची थकबाकी द्यावी अशी मागणी सतत होत होती. परिवहन व्यवस्थापक संदीप माळवी यांनी साडेपंधरा कोटींची रक्कम कर्मचा-यांच्या थकबाकीपोटीसाठी देण्यास मंजुरी दिल्यानं कर्मचा-यांना त्यांच्या थकबाकीची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading